लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पीडिएमसीतील चार शिशुंच्या मृत्यू प्रकरणात केवळ मृत शिशुंच्या व्हिसेरा अहवालाची प्रतीक्षा आहे. शिशुंच्या मृत्यूचे निश्चित कारण स्पष्ट झाल्यानंतर वैद्यकीय शिक्षण, आरोग्य व पोलीस विभागाची संयुक्त बैठक होणार आहे. बैठकीतील निर्णयानंतर शासनामार्फत पीडीएमसी प्रशासनावरील कारवाईची दिशा ठरविण्यात येणार आहे. शिशुंच्या मृत्यू प्रकरणात जिल्हा शल्य चिकित्सक अरुण राऊत यांच्या डॉक्टरांच्या चमुने केलेल्या चौकशीनंतर पोलिसांनी डॉ.भूषण कट्टासह परिचारिका विद्या थोरातला अटक केली. पीडीएमसी प्रशासनाच्या चौकशीत परिचारिका विद्या थोरातने चुकीचे इंजेक्शन दिल्याचे स्पष्ट झाले. त्यातच बालरोग विभाग प्रमुखांनीही त्यांची जबाबदारी पूर्ण न करता अनधिकृतपणे रजा घेतल्याचा ठपका ठेवत त्यांचे निलंबन केले गेले. अकोला येथील डॉक्टरांच्या चमुने तीन शिशुंचे शवविच्छेदन केल्यानंतर प्राथमिक अंदाज वर्तविला. त्यामध्येही चुकीच्या औषधोपचारामुळे शिशुंचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. आता व्हिसेरा अहवालावरून तीनही शिशुंच्या मृत्यूचे कारण पुढे येणार आहे. नागपूर येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेतून व्हिसेरा अहवाल लवकरच प्राप्त होणार असल्याचे संकेत आहे. व्हिसेरा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलीस, आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे बैठक बोलाविण्यात येईल. त्या अहवालातील तथ्य्यावर चर्चा झाल्यानंतर पुढील कारवाईसाठी शासनाकडे पाठविला जाईल. - प्रवीण शिनगारे, संचालकपीडीएमसीतील प्रकरणाच्या चौकशीत बालरोग विभाग प्रमुख, डॉ.कट्टा व दोन परिचारिकांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, असा अहवाल डीएमईआरला पाठविण्यात आला आहे. व्हिसेरा अहवाल लवकर मिळावा, यासाठी प्रयोगशाळेला कळविले आहे. - डॉ. अनिल बत्रा, अध्यक्ष, चौकशी समिती
मृत शिशूंच्या व्हिसेरा अहवालाची प्रतीक्षापीडीएमसीतील प्रकरण : संयुक्त बैठकीनंतर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2017 12:05 AM