अमरावती : राज्याच्या महसूल व वनविभागाने भारतीय वनसेवेतील तब्बल ५३ अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत. मात्र, प्रादेशिक वनविभागात हेविवेट सात जागांवर अद्यापही आयएफएस उपवनसंरक्षकांची नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे या जागेवर कुणाची वर्णी लागणार याकडे नजरा लागल्या आहेत.यात नंदूरबार जिल्ह्यातील यावल, जळगाव, धुळे, बुलडाणा, अमरावती, ब्रह्मपुरी, पांढरकवडा या सात प्रादेशिक वनविभागात डीएफओंच्या नियुक्तीची प्रतीक्षा आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत सिपना वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक डॉ. शिवबाला एस. यांची बदली करण्यात आली. पण त्यांची नियुक्ती कुठेही झाली नाही. तेसुद्धा नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. बुलडाणा प्रादेशिक वनविभागात अतिक्रमणाची मोठी समस्या असताना येथे उपवनसंरक्षकांची नियुक्ती नाही. पांढरकवडा प्रादेशिक वनविभागात वाघांचे वास्तव्य आहे. येथून सीमेवर आंध्र प्रदेशातून तस्करीची भीती असताना पांढरकवडा येथे डीएफओंची नियुक्ती करण्यात आली नाही.पांढरकवडा हे राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्या गृहक्षेत्रातील आहे. येथे उपवनसंरक्षकांची नियुक्ती न होणे आश्चर्यकारक मानले जात आहे. अमरावतीचे उपवनसंरक्षक गजेंद्र नरवणे यांची मंत्रालयात उपसचिव म्हणून नियुक्ती झाली. परंतु, नरवणे यांच्या जागी कुणाचीही नियुक्ती झाली नाही. १५ ऑगस्टनंतर डीएफओंच्या बदल्यांची ही यादी जाहीर होईल, असे संकेत आहे.
पाच विभागीय वनाधिका-यांच्या बदल्यामहसूल व वनविभागाने गुरुवार, १३ ऑगस्ट रोजी पाच विभागीय वनाधिकारी (गट अ) यांच्या विनंती अर्जावर बदल्या केल्या आहेत. यात एम.एन. खैरनार (अमरावती), एम.के. गोखले (नागपूर), व्ही.एन. सातपुते (औरंगाबाद), पी.व्ही. जगत (औरंगाबाद), बी.ए. पोळ (पुणे) यांचा समावेश आहे.