जिल्हा परिषद स्थायी समितीत गाजला मुद्दा
अमरावती : प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत नांदगाव खंडेश्र्वर तालुक्यांतर्गत दहिगाव ते पाळा या रस्त्याचे काम अल्पावधीत उखडले. त्यामुळे शुक्रवारी जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी आक्रमक होऊन संबंधित अधिकाऱ्याला जाब विचारला.
जिल्ह्यात प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत तयार केलेले अनेक रस्ते वर्षभरातच उखडले आहे. याचे पुरावे देत झेडपी सदस्यांनी स्थायी समिती सभेत चांगलाच संताप व्यक्त केला. विरोधी पक्षनेते रवींद्र मुंदे यांनी नांदगाव खंडेश्र्वर तालुक्यातील दहिगाव ते पाळा रस्त्याच्या निकृष्ट कामांचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. विशेष म्हणजे दोन महिन्यांपूर्वीच हा रस्ता तयार करण्यात आला असून त्यावरील डांबरी सीलकोट उघडल्याचे पुरावे अध्यक्ष बबलू देशमुख यांच्यासमोर सादर केलेत. याशिवाय दर्यापूर तालुक्यातील ११ किलोमीटर लांबीचा रस्ता पूर्ण होण्याअगोदरच त्यावर खड्डे पडल्याचा आरोप सुनील डिके यांनी पीएनजेएसवाय अंतर्गत केलेले रस्ते देखभाल दुरुस्तीच्या ५ वर्षांच्या कालमर्यादेत येतात. मात्र, या रस्त्यांना पाच वर्षांचा अवधी होण्यापूर्वीच जर रस्ते खराब होत असतील तर ही बाब अतिशय गंभीर असल्याचे झेडपी अध्यक्ष बबलू देशमुख यांनी पीएनजेएसवायचे कार्यकारी अभियंता खान यांचे निदर्शनास आणून दिले. खराब झालेले रस्ते तातडीने दुरुस्तीचे निर्देशही दिले. यावेळी शिक्षण, बांधकाम, पाणी पुरवठा, घरकुल, पंचायत आदी विभागाच्या विषयावर चर्चा करण्यात आली. सभेला उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, सभापती बाळासाहेब हिंगणीकर, सुरेश निमकर, सदस्य जयंत देशमुख, सुहासिनी ढेपे, अभिजित बोके, सीईओ अविश्यांत पंडा, डेप्युटी सीईओ तुकाराम टेकाळे आदी उपस्थित होते.
बॉक्क
मेळघाटातील कोरोनाची स्थिती चिंताजनक
मेळघाटातील धारणी व चिखलदरा या दोन तालुक्यात गत काही दिवसांत कोरोनाचा संसर्ग चांगलाच वाढला असल्याचा मुद्दा जयंत देशमुख यांनी मांडला. मेळघाटात आरोग्य विभागाकडून केल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती डीएचओ रणमले यांनी अध्यक्षासमोर सभागृहात मांडली.
बॉक्स
कोविड केअर सेंटरमध्ये गाेंधळ
चांदूर रेल्वे येथील समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात असलेल्या कोविड सेंटरमध्ये केवळ पाच रुग्ण असताना नोंदीत ३५ रुग्ण दाखविण्यात येऊन त्याच्यावर खर्च करण्यात येत असल्याचे दाखविण्यात आल्याचा आरोप सभापती सुरेश निमकर यांनी केला. माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी याबाबत आपल्याकडे तक्रार केल्याचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी सांगितले. मात्र, असा कुठलाही प्रकार सुरू नसल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले म्हणाले.