लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दहा-अकरा महिने ऑनलाईन शाळा करून थकलेल्या विद्यार्थ्यांना आता नेहमीची शाळा हवीहवीसी वाटू लागली आहे. मार्च २०२० नंतर मुले थेट फेब्रुवारी २०२१ मध्येच शाळेत पोहोचले. विद्यार्थ्यांमध्येसुद्धा उत्स्फूर्तपणे शाळेत येण्याचा उत्साह दिसून येत असून, आजच्या घडीला मोर्शी शहरातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची उपस्थिती असल्याची आढळून येत आहे. सर्व शाळांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंग पाळले जात असले तरी संसर्ग वाढू लागल्याने कोरोना अटकावासाठी त्रिसूत्रीच्या प्रभावी अंमलबजावणीची गरज आहे.
तालुक्यात सर्वांत मोठ्या शिवाजी शाळेत शहरातील तसेच तालुक्यातील अनेक गावांवरून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असून, विद्यार्थ्यांच्या शाळेच्या प्रवेशद्वारातील प्रवेशापासून ते शाळा सुटेपर्यंत शासनाच्या संपूर्ण नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची गांभीर्याने काळजी घेत असल्याचे दिसून येते. अनुपस्थित विद्यार्थी व पालकांशी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक प्रत्यक्ष संपर्क करून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बहुतांश शाळांकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबद्दल प्रशासन, सामाजिक संस्था, विद्यार्थी व पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.
------------