अमरावती : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हिवाळी २०२० आणि उन्हाळी २०२१ या दोन्ही महाविद्यालयीन परीक्षा कशा प्रकारे घ्याव्यात, यासंदर्भात केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशाची प्रतीक्षा आहे. मात्र, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने प्रचलित पद्धतीने आणि ऑनलाईन अशा दोन्ही प्रकारच्या परीक्षेची तयारी सुरू केली आहे.
अमरावती विद्यापीठाने शैक्षणिक कॅलेंडर जारी केले आहे. त्यानुसार शैक्षणिक वर्ष आरंभले असून, १५ फेब्रुवारी २०२१ पासून हिवाळी २०२० परीक्षांना सुरू होणे अपेक्षित आहे. त्याअनुषंगाने परीक्षा विभागाने २ जानेवारीला पेपर सेटरची बैठक घेतली. यात ज्या अभ्यासक्रमांचे पेपर तयार नाहीत, ते नव्याने तयार करण्यात येणार आहे. विद्यापीठ अंतर्ग़त ४८ विषय प्राध्यापकांचे पेपर सेटर समितीत समावेश आहे. बहुपर्यायी प्रश्नावली तयार करण्यावर भर दिला जाणार आहे. पेपर सेटरच्या पॅनेलमधील एकूण चार पेपर निवडले जातील, अशी तयारी सुरू झाली आहे. यापूर्वी अंतिम वर्ष, अंतिम सत्राच्या परीक्षा यूजीसीच्या गाईडलाईननुसार घेण्यात आल्यात. आता पुन्हा महाविद्यालयीन परीक्षा प्रणाली कशी असावी, याबाबत यूजीसीच्या निर्देशांची प्रतीक्षा आहे. तूर्त विद्यापीठाने प्रचलित पद्धत आणि ऑनलाईन अशा दोन्ही प्रकारच्या परीक्षांची तयारी चालविली आहे. यूजीसीचे जे निर्देश येतील, त्या पद्धतीने परीक्षा घेण्यात येईल, अशी तयारी परीक्षा विभागाची आहे.
---------------------
हिवाळी २०२० परीक्षा लांबणीवर
विद्यापीठाच्या शैक्षणिक कॅलेंडरनुसार १५ फेब्रुवारीपासून हिवाळी २०२० परीक्षांना प्रारंभ होऊन ३० दिवसांत निकाल जाहीर होणे अपेक्षित आहे. मात्र, यूजीसीचे परीक्षांविषयी तूर्तास कोणतेही गाईडलाईन नाही. त्यामुळे प्रणाली निश्चित नसताना परीक्षांचे नियोजन करताना विद्यापीठ प्रशासनापुढे अडथळे येत आहेत.
---------------------
प्रचलित आणि ऑनलाईन अशा दोन्ही प्रकारच्या परीक्षांचे नियोजन करण्यात येत आहे. अखेर परीक्षा कशा प्रकारे घ्याव्यात, हे निर्देश शासन किंवा यूजीसीचे मान्य करावे लागते. त्यानुसार हिवाळी २०२० आणि उन्हाळी २०२१ परीक्षा घेण्यात येतील.
- हेमंत देशमुख, संचालक परीक्षा व मूल्यांकन मंडळ.