सेमाडोह ते रायपूर मार्गावरील पूल वाहून जाण्याची भीती
(फोटो कॅप्शन : सेमाडोह रायपूर मार्गावरील कुवापाटी खापरा नदीपात्रात वाहून आलेले वृक्ष आणि अनेक ठिकाणी अर्धवट राहिलेला रस्ता)
लोकमत विशेष
नरेंद्र जावरे- परतवाडा : २२ जुलै रोजी झालेल्या ढगफुटीचा तडाखा मेळघाटातील अतिदुर्गम भागाला सर्वाधिक बसला. सेमाडोह येथून जाणारे सर्वच मार्ग क्षतिग्रस्त झाले आहे. ग्रामीण भागात आदिवासी पाड्यांना जोडणारे मार्ग बंद असल्याचे प्रशासनाचे सर्वेक्षण सुरू असून, प्रत्यक्ष कामाला केव्हा सुरुवात होईल, हे मात्र लालफितीत अडकले आहे.
ढगफुटीमुळे सेमाडोह येथे तीनशे १० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. परिसरातून वाहणाऱ्या सिपना, खुर्शी, खंडू, या प्रमुख नद्यांसह नाल्यांना महापूर आला. काही ठिकाणी अर्धा किलोमीटरपर्यंत असे दीड किलोमीटरपेक्षा अधिक डोंगर कोसळले. परिणामी मार्गच बंद झाल्याने आदिवासी पाडे संपर्कहीन झाले. सार्वजनिक बांधकाम विभागाने परतवाडा ते धारणी मार्गावरील सेमाडोहच्या खचलेल्या भूतखोरा पुलावरील काम करून आंतरराज्य मार्ग सुरळीत केला. मात्र, जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत रस्ते, त्यावर पडलेला मलबा हटविण्याच्या कामाव्यतिरिक्त प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नसल्याचे संतापजनक चित्र आहे.
बॉक्स
आरोग्य यंत्रणेला प्रथम प्राधान्याची गरज
सेमाडोह, माखला, चुनखडी या मार्गावर दीड किलोमीटरचा डोंगर कोसळला. लहान-मोठे पूल खचलेला रस्त्याच्या कामाला अद्याप सुरुवातच झालेली नाही. आठ दिवसांचा कालावधी होऊनही मलबा हटविण्यासाठी बराच वेळ लागणार आहे. परंतु त्यासाठी वरिष्ठ प्रशासकीय यंत्रणा किंवा पदाधिकाऱ्यांनी तत्काळ तुटलेला संपर्क जोडून आरोग्य यंत्रणेला प्रथम प्राधान्य देण्याची गरज आहे.
बॉक्स
सेमाडोह-रायपूर मार्गावरील पुलांना धोका
सेमाडोह, रायपूर मार्गावर खापरा नदी व कुवापाटी नदी मार्गावरील पूल धोकादायक ठरले आहे. नदीतून भव्य वृक्ष वादळी पावसात वाहून आल्याने पुलांच्या कठड्यावर अडकून पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरील मुलांना धोका निर्माण झाला आहे. काही ठिकाणी सहा मीटर रुंदीचा मार्ग तीन मीटर रुंद झाल्याने खचलेल्या रस्त्यावरून जीवघेणी कसरत करीत वाहन काढावी लागत असल्याचे रायपूरचे उपसरपंच सानू धांडे यांनी सांगितले.
कोट
सेमाडोह ते रायपूर मार्गावरील आठ किलोमीटरचा रस्ता नादुरुस्त झाला आहे. गुलाम कठड्याला वृक्ष अडकल्याने वाहून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. सर्वेक्षणासोबतच काम करणे गरजेचे आहे.
- सानू भुऱ्या धांडे,
उपसरपंच, रायपूर