अमरावती : पहिल्या महायुद्धात शहीद झालेल्या ब्रिटिश सैनिकाच्या समाधीला बांधलेले कठडे चोरट्याने लंपास केल्याची घटना धामणगाव येथे रविवारी रात्री घडली.
धामणगाव शहरातील हिंदू स्मशानभूमीमागील परिसरात असलेल्या इंग्रजाच्या समाधीला लोखंडी कठडे बसविण्यात आले होते. काहीच दिवसांत हे थडगे चोरट्यानी पाळत ठेवून लोखंडी कठडे चोरून नेले. समाजसेवक मोरेश्वर शेंडे यांनी त्याची फिर्याद दत्तापूर पोलिसात दिली आहे. पोलिसांनी प्राप्त तक्रारीवरून भादंविचे कलम ३७९ अन्वये गुन्ह्याची नोंद केली आहे. यासंदर्भात अधिक तपास दत्तापुर चे पोलीस निरीक्षक राजेश राठोड करीत आहेत.
असा आहे इतिहास
धामणगाव शहरात ब्रिटिश काळात हार्डनगंज नावाची एक छावणी होती. त्यावेळी या छावणीतील सैनिक येथेल बर्ड एडगर माही यांचा १० मे १९२१ रोजी पहिल्या महायुद्धात मृत्यू झाला. त्यावेळी हिंदू स्मशानभूमीच्या बाजूला उत्तर पश्चिम भागात थडगे बांधले होते. शंभर वर्षांपूर्वी बांधलेले थडगे शिकस्त झाल्याचे सामाजिक कार्यकर्ते मोरेश्वर शेंडे यांनी ब्रिटिश सरकारला १९९५ मध्ये कळविले होते. कॉमन वेल्थ ग्रेव्ह कमिशनने त्याचे नूतनीकरण नुकतेच केले. विशेष म्हणजे, हार्डनगंज नावाची शाळा धामणगाव शहरात आजही आहे.