मोर्शी : लॉकडाऊनच्या काळात शहरात अकारण फिरत असाल, तर तुम्हाला ॲन्टिजेन चाचणीला सामोरे जावे लागेल. अमरावती शहराप्रमाणेच अकारण फिरणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी मोर्शीतही चौकात मोबाईल युनिटद्वारे कोरोना चाचणी केली जात आहे.
शहरातील जयस्तंभ चौकात मंगळवारी ७५ जणांची कोविड तपासणी करण्यात आली. त्यामध्ये १२ नागरिक पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यांना कोविड रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, शासनाच्यावतीने गर्दी होऊ नये व नागरिकांनी विनाकारण फिरू नये, याकरीता उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. केवळ अत्यावश्यक सेवा सुरू ठेवल्या आहेत. तरीही शहरात शेकडो नागरिक अकारण फिरतात. यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसुद्धा असल्याचे नाकारता येत नाही. त्यामुळे कोरोना पसरू शकतो.
आकडे भयावह
२० एप्रिल रोजी सकाळी जयस्तंभ चौकात सुरू असलेल्या रॅपिड अँटिजेन टेस्टमध्ये आश्चर्यकारक आकडे समोर आले आहेत. सकाळी १० वाजता सुरू झालेल्या तपासणीत पहिल्या अर्ध्या तासात २५ तपासण्या झाल्या. त्यापैकी १० जण पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. हेच नागरिक विनाकारण व विनामास्क बाजारपेठेत फिरत असल्याने कोरोना सुपर स्प्रेडरचे काम करतात. दुपारी १२ वाजेपर्यंत झालेल्या एकूण ७५ चाचण्यांपैकी आणखी दोघे बाधित आढळले. उपजिल्हा रुग्णालयात आज झालेल्या २० चाचण्यांमध्ये चार नागरिक पॉझिटिव्ह आले आहेत. मागील काही दिवसांपासून मोर्शी तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. सदर कोरोना चाचणी मोहीम आरोग्य सहायक नेवारे यांचे नेतृत्वात स्थानिक उपजिल्हा रुग्णालय, नगर परिषद राजेश ठाकरे, वाघमारे, वाहतूक पोलीस सुभाष वाघमारे, मोहन बारब्दे यांच्या साहाय्याने राबविली गेली.