वणी ममदापूर ग्रामपंचायत ठरली तालुक्यातून सर्वात लखपती
१,०१४ मतदार संख्येमागे विकास कामांना मिळाले तब्बल ४ कोटी
कोरोना महामारीच्या काळातही विकास कामांना नो ब्रेक-सरपंच मुकुंद पुनसे यांचा विक्रम
तिवसा/ सूरज दाहाट
तालुक्यातील वणी ग्रामपंचायत ही वणी, ममदापूर व सुल्तानपूर अशी तीन गावे मिळून १,०१४ मतदार संख्या असलेली एक छोटीसी ग्रामपंचायत परंतु लोकसंख्येच्या तुलनेत या ग्रामपंचायतचा स्वनिधी वगळता इतर योजनेतून ग्रामपंचायतीला जो निधी गेल्या तीन वर्षात मिळाला तो आश्चर्यचकित करणाराच आहे परंतु ही वस्तुस्थिती आहे. कारण १,०१४ मतदार संख्या असणाऱ्या ग्रामपंचायतीला ४ कोटी रुपयाचा विकास निधी मिळालेली तालुक्यातील ही पहिलीच ग्रामपंचायत असल्याचे दिसून येत आहे.
हा सर्व निधी इतका सहजासहजी मिळालेला नसून यामागे येथील कर्तव्यदक्ष सरपंच मुकुंद पुनसे यांचे प्रयत्न व पाठपुरावा मोलाची देण असल्याचे बोलले जात आहे, कारण यामध्ये राष्ट्रीय महामार्ग ६ ते ममदापूर रस्त्याकरिता जो १ कोटी १४ लक्ष रुपयाचा निधी मिळाला याकरिता सरपंच मुकुंद पुनसे यांनी ४४ डिग्री तापमान असतांना रखरखत्या उन्हामध्ये १३ गावकऱ्यांना सोबत घेऊन अन्नत्याग आंदोलन करत थेट मंत्रालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देत प्रशासनास वेठीस धरले होते तर, परिसरातील गोरगरीब ग्रामीण जनतेच्या सोईकरिता १ कोटी रुपयातून ममदापूर येथे उभारल्या जाणाऱ्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या सुसज्ज अशा इमारतीकरिता सुद्धा त्यांना एक वर्ष न्यायालयात लढा लढावा लागला. अशाच प्रकारे त्यांनी विविध योजनेतून सातत्याने पाठपुरावा करून असंख्य विकास कामे गावात खेचून आणली. यामध्ये वणी आणि ममदापूर येथील सभामंडपाकरिता १४ लक्ष, वणी ममदापूर सुल्तानपूर अंतर्गत रस्ते विकासाकरिता तांडावस्ती, २५ / १५ यासह अन्य योजनेतून ३६ लक्ष तर विद्यार्थी व युवकांसाठी अभ्यासिका आणि खुल्या व्यायाम शाळेकरिता समाजकल्याण आणि जिल्हा क्रीडा विभागाकडून १० लक्ष, सुल्तानपूर येथील पाणी पुरवठा योजनेकरिता १० लक्ष, सुल्तानपूर येथील हनुमान मंदिराच्या सौंदर्यीकरणाकरिता तीर्थक्षेत्र विकास निधी अंतर्गत ४ लक्ष, वणी येथील जिल्हा परिषद शाळेच्या सौंदर्यी करणाकरिता ३ लक्ष, ममदापूर ते काटसूर रस्त्याकरिता १५ लक्ष, वणी ते ममदापूर रस्ता व पूल बांधकामाकरिता ३५ लक्ष, शेत रस्त्यांची पत सुधारण्याकरिता पालकमंत्री पांदण रस्ते सुधार योजनेतून १२ लक्ष, ममदापूर येथील प्रवाशी निवारा बांधकामाकरिता स्थानिक विकास आमदार निधी अंतर्गत ५ लक्ष, श्री द्वारकाधीश महानुभाव आश्रम वणी येथील विद्युत व्यवस्थापनाकरिता जिल्हा नियोजन अंतर्गत १ लक्ष ३९ हजार, ममदापूर तिवसा रस्त्यावरील पूल बांधकामाकरिता ३० लक्ष, मोक्षधाम विकासाकरिता मूलभूत सुविधा अंतर्गत ५ लक्ष एवढा निधी ग्राम विकासाकरिता खेचून आणल्यामुळे सरपंच मुकुंद पुनसे यांचे सर्वत्र कौतुक होत असून वणी ग्रामपंचायत ही कोरोना काळातही विकासकामे खेचून आणणारी तालुक्यातील एकमेव ग्रामपंचायत ठरली. सरपंच मुकुंद पुनसे हे तालुक्यातील आदर्श सरपंचांपैकी एक आहेत.