(फोटो)
अमरावती : सदस्यांच्या वाॅर्ड विकास व स्वेच्छा निधीवरून मंगळवारच्या महापालिकेच्या आमसभेत वातावरण चांगले. आयुक्तांनी दायित्व व खर्चाचे आकडे सांगून एकमुस्त निधी देण्यास नकार दिल्यानंतर सत्ताधारी व विरोधकांनी एकीची मोट बांधली. त्याचवेळी महापौरांनी रूलिंग देण्यावरून भाजप व व त्यांच्या सहयोगी सदस्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. याच मागणीवरून भाजपचे काही सदस्य व सहयोगी सदस्यांमध्ये दुफळी दिसून आली.
महापालिका आमसभेच्या सुरुवातीलाच मागच्या सभेचे कार्यवृत्तांत मंजूर करण्यात आल्यानंतर भाजपचे सहयोगी सदस्य सदस्य प्रकाश बनसोड यांनी सदस्यांचा वार्ड विकास व स्वेच्छा निधी मागच्या अर्थसंकल्पीय सभेत ५० लाख मंजूर करण्यात आले. मात्र, प्रशासनाची याविषयी काहीच तयारी नाही. आतापर्यंत अंदाजपत्रक तयार करण्यात आले, असे सभागृहात स्पष्ट करून विषयाला वाचा फोडली. यावर ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब भुयार यांनीदेखील विलंब लावू नका, प्रशासनाच्या कामाची गती ही मंद आहे, अशी तोफ डागली व यानंतर सभागृहाचा नूरच पालटला.
सदस्यांच्या कार्यकाळाचे हे शेवटचे वर्ष व समोर पावसाळा आहे. अद्याप प्रशासनाची तयारी नाही. अंदाजपत्रके व निविदा केव्हा निघतील? त्यामुळे प्रशासनाने प्रत्येकी २५ लाखांप्रमाणे ५० लाखांचा निधी एकमुस्त द्यावा, ही मागणी सदस्यांनी लावून धरली. ज्येष्ठ सदस्य विलास इंगोले, विरोधी पक्षनेते बबलू शेखावत यांनीदेखील ही मागणी सभागृहात उचलून धरली. सत्तापक्षाचे अजय गोंडाणे यांनी मोजक्याच सदस्यांसाठी तरतूद करण्यात आल्याचा आरोप करीत तोफ डागली.
चर्चेत मिलिंद चिमोटे, नीलिमा काळे, प्रशांत डवरे, सलीम बेग, चेेतन पवार, मो. इम्रान, राजेंद्र तायडे यांनी सहभाग नोंदविला.
बॉक्स
आयुक्तांनी वाचला दायित्व व खर्चाचा पाठा
महापालिकेकडे असलेल्या दायित्वाची यादी व त्याच्या तुलनेत खर्चाचा पाढाच आयुक्तांनी वाचला. उत्पन्नाची गती कमी असताना खर्चाचा विनियोग करताना प्रशासनाची होत असलेली कसरत स्पष्ट केली. निविदा प्रक्रिया कालपव्यय ठरणार नाही, याची जबाबदार स्वीकारतो व सदस्यांचा भावनांचा विचार करून योग्य तो निर्णय घेऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली. यानंतर सभागृहाचे वातावरण तापतच गेले.
बॉक्स
बजेटवेळी घोषणा, अंमलबजावणी का नाही?
बजेट सभेच्या वेळी सभापतींनी रूलिंग दिले आहे. त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी प्रशासनाची व सभागृहाचे प्रमुख म्हणून महापौरांची आहे, असे बबलू शेखावत म्हणाले. बिले ही मार्च २००२ मध्ये दिली जातील. त्यामुळे निविदा लावा, एकही टेंडर खाली जाणार नाही, असे प्रकाश बनसोड म्हणाले. आयुक्तांसोबत चर्चा झाल्यानंतरच महापौरांनी निर्णय दिला होता, असे सुनील काळे म्हणाले.
बॉक्स
‘गुळाच्या गणपती’ होऊन काम करू नका
सभागृहातील चर्चेनंतर महापौरांनी रूलिंग द्यावे, अशी मागणी प्रकाश बनसोड यांनी केली. त्यावर महापौरांनी यापूर्वीच्या आमसभेत रूलिंग दिले असल्याने त्यावर कायम असल्याचे तुषार भारतीय म्हणाले. यावर बनसोड संतप्त झाले व ‘गुळाच्या गणपती’ होऊन काम करू नका, असे सभापतींना म्हणाले. बनसोड यांची बाजू गोंडाणे यांनी उचलून धरल्यानंतर वातावरण तापले व सभागृह १० मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले.
बॉक्स
बुधवारपासून अंदाजपत्रके होणार तयार
स्थगितीनंतर अर्ध्या तासाने सभागृह सुरू झाल्यानंतर अर्थसंकल्पीय सभेत झालेल्या निर्णयांची अंंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केल्यानंतर बुधवारपासून सदस्यांच्या कामांची अंदाजपत्रके बुधवारपासून तयार करणे सुरू होईल. प्रत्येक सदस्याला वाॅर्ड विकासासाठी २५ लाख व स्वेच्छा निधी २५ लाख देण्यात येत आहे. प्रशासनाला यावर अंमलबजावणी करण्याचे महापौरांनी सांगितल्यानंतर सभागृहाचे वातावरण शांत झाले.
बॉक्स
‘निधीसाठी सदस्यांवर भीक मागण्याची पाळी’
हक्काचा निधी असताना वाॅर्ड विकास व स्वेच्छा निधीसाठी सदस्यांवर सभागृहात भीक मागण्याची पाळी आल्याचे बबलू शेखावत म्हणाले. करदाता तयार असताना कर भरून घेतला जात नाही, कसे वाढणार उत्पन्न, असा घणाघात त्यांनी केला. निविदेपासून ती उघडेपर्यंत व नंतर वाटाघाटीसाठी सदस्यांना फोन करावे लागतात. सभापतींच्या निर्देशांची अंमलबजावणी होत नाही, असे सांगून त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले.