तिवसा : मध्य प्रदेश तसेच राज्यातील काही भागात जोरदार पाऊस आल्याने ७२ तासांमध्ये मोर्शी येथील अप्पर वर्धा धरण (नळ दमयंती सागर) ची दारे उघडण्याची शक्यता आहे. यामुळे वर्धा नदीकाठावरील गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा तिवस्याचे तहसीलदार वैभव फरतारे यांनी दिला आहे.
मध्य प्रदेशात पावसाची अधिक नोंद झाल्याने मोर्शी हद्दीत असलेल्या नळ दमयंती धरणाची जलाशय पातळी ३३९.२० मीटर झाली आहे. जलसाठा ४२०.९८ दलघमी झालेला आहे, जलाशय प्रचलन सूचीप्रमाणे जुलै २०२१ पर्यंत जलसाठा ३४१.२० मीटर तलांकापर्यंत भरावयाचा आहे. पावसाचा अंदाज पाहता धरण सुरक्षेच्या दृष्टीने येत्या ७२ तासांत किंवा त्यानंतर केव्हाही धरणात येणाऱ्या पाण्याच्या येव्यानुसार पुराचे पाणी नदीपात्रात सोडावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिवसा तहसील हद्दीतील वर्धा नदीकाठावरील ग्रामस्थांनी पात्रात पोहण्याकरिता, कपडे-जनावरे धुण्याकरिता जाऊ नये, असे आवाहन तिवसा महसूल विभागाने केले आहे. मंडळ अधिकारी यांनी अधिनस्थ सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील यांना अवगत करून कोतवालामार्फत मुनादी द्यावी, असे तहसीलदारांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.