दिन विशेषअमरावती : डॉ. भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख म्हणजे उपेक्षित, वंचित आणि बहुजनांचे दीपस्तंभ. शिक्षणाचा मार्ग बहुजनांसाठी प्रशस्त करणारे आणि शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या भाऊसाहेबांचा आज ५० वा स्मृतिदिन. ‘लोकमत’च्यावतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली. डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे जन्मगाव पापळ आणि मूळ घराणे कदम. ज्या घराण्याचे इतिहासात चौफेर क्षात्रतेज उधळले. राजवैभव भोगले व मराठ्यांच्या लढवय्या वृत्ती ज्यांनी जोपासल्या, फुलवल्या, रूजविल्या व नावारूपाला आणल्या, तेच हे घराणे. या घरण्यात भाऊसाहेबांचा २७ डिसेंबर १८९८ साली जन्म झाला. हायस्कूलच्या शिक्षणासाठी ते अमरावतीत आले. शिक्षणाची गोडी निर्माण झाली. अभ्यासू वृत्ती आणि चिंतनशीलतेच्या बळावर ते यशाचे टप्प्यांवर टप्पे गाठत गेले. अज्ञात प्रेरणेने, आंतरिक ओढीने अंतर्मुखजिद्द आणि चिकाटी त्यांच्यात मुळातच होती. कुठल्या तरी अज्ञात प्रेरणेने आणि आंतरिक ओढीने ते अंतर्मुख होत चालले होते. याच काळात त्यांच्या हृदयात राष्ट्रभक्तीचा अंकुर फुटू लागला. अमरावतीच्या वास्तव्यादरम्यान योगायोगाने ७ फेब्रुवारी १९१७ साली श्रीमंत बाबासाहेब खापर्डे यांच्या कन्येच्या विवाहाच्या निमित्ताने भाऊसाहेबांची भेट लग्नाला आलेल्या महाराष्ट्र केसरी लोकमान्य टिळकांशी झाली. लोकमान्यांनी भाऊंच्या चेहऱ्यावरील कोणते भाव वाचले, कोणास ठाऊक. पण, मुद्दाम त्यांची चौकशी केली. त्यांच्यातील राष्ट्रभक्तीचा अंगार लोकमान्यांनी ओळखला होता. विलायतेतून शिक्षण घेऊन परतल्यानंतर त्यांची सामाजिक चळवळ अधिकच वाढत गेली. भाऊसाहेबांच्या वकिलीची सुरूवात झाली ती गुलाबराव नायगावकरांच्या अत्यंत गाजलेल्या खटल्याने. नायगावकरांचा सत्यशोधक जलसा हा त्याकाळी मोठा प्रख्यात होता. त्यातून ब्राह्मणांनी निर्माण केलेल्या सामाजिक भेदांवर अत्यंत तीव्र टीका केलेली असे. त्यामुळे विरोधकांनी नायगावकरांच्या तमाशात दंगल माजवली आणि पोलिसांनी गुलाबराव व त्यांच्यावर फौजदारी खटला भरला. भाऊसाहेबांनी त्यागाचे राजकारण केले. राजकीय विरोधकाला भाऊसाहेब वैयक्तिक जीवनात विरोधक मानत नसत. ते एक कुशल संघटक, कृषिमंत्री, समाजसेवक होते. ज्याने हे साधले ते होते डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख.
ज्ञानक्रांतीचा राजमार्ग दाखविणारा योद्धा
By admin | Published: April 10, 2015 12:26 AM