फोटो पी १० वरूड
वरूड : वरूड तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शेकडो रुग्ण वाढले असून अनेकांचा मृत्यू होत आहे. कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यानंतर गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या वाढत आहे. तर कंटेन्मेंट झोन सुद्धा नाहीत. नागरिकांचा स्वैराचार वाढत असून बिनधास्तपणे संचार सुरू असल्याने शहरासह तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
कोरोनामुक्तीसाठी नागरिकांचे सहकार्य अपेक्षित असून नागरिकांची झुंबड कमी होतच नसल्याने रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. आता ग्रामीण भागात समूह संसर्गाने सुरुवात केली. यामुळे अजूनही इथले भय संपलेले नसून नागरिकांनी सावधान राहण्याची वेळ आली आहे, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, असे सूतोवाच प्रशासनाने केले आहे. आर्थिक परिस्थिती डबघाईस आल्याने उपचाराचा खर्च सुद्धा झेपत नाही. संचारबंदी, जमावबंदी असताना कुणी पालन करताना दिसत नाही, तर लॉकडाऊन नावालाच उरलेला आहे. प्रशासनाने अनेक परिस्थितीवर मात करून कोरोनाला संपविण्याचे आटोकाट प्रयत्न केले, तर सुरुवातीला नागरिकांनी सहकार्य केले. मात्र, मार्च महिन्यापासून लॉकडाऊन असताना नागरिकांनी वाटेल तसे वागणे सुरू केले. विनाकारण गर्दी करून कोरोनाला वाट मोकळी करून दिली तर काहींनी मास्क खुंटीला टांगून ठेवले. सॅनिटायझरचा वापर बंद केला.
कोरोनाबाधितांची संख्या २५०० वर!
बिनधास्त संचार सुरू करून पुन्हा कोरोनाला आमंत्रण देण्याचा प्रकार झाला. आणि पाहता पाहता एक ते दीड महिन्यात कोरोनाग्रस्तांची संख्या अडीच हजाराला पार करून गेली. नागरिकांचे सहकार्य मिळत नाही म्हणून अधिकाऱ्यांनी हात वर करून कंटेन्मेंट झोनसुद्धा कागदावरच ठेवले. यामुळे कोरोनाने ग्रामीण भागात पाय रोवणे सुरू केले.
ही गावे हाय रिस्कमध्ये
हाय रिस्क झोनमध्ये शेंदुरजनाघाट, लोणी, सावंगी, बेनोडा, रोशनखेडा, राजुराबाजार, कुरुळी, सुरळी, पुसला, आमनेर व जरुड या गावांचा समावेश आहे. आठ दिवसांत वरूड शहरात २६८ तर तालुक्यात १ हजार ८७ रुग्णांची नोंद झाली आहे.
लॉकडाऊनची अंमलबजावणी
एसडीओ नितीनकुमार हिंगोले हे नगर परिषद, पोलीस, पंचायत आणि महसूल प्रशासनासह हातात काठ्या घेऊन रस्त्यावर उतरले. अनेकांना कोरोनाचा महाप्रसाद सुद्धा दिला. वाहने तपासणी करून ई पास नसलेल्यांवर दंडात्मक कारवाई केली. शहरातील चौकाचौकात पोलिसांचा खडा पहारा देण्यात आला. गटविकास अधिकारी वासुदेव कणाटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अमोल देशमुख, मुख्याधिकारी रवींद्र पाटील, ठाणेदार प्रदीप चौगावकर, एपीआय सुनील पाटील यांनी १२ वाजेची घंटी वाजताच रस्त्यावर उतरून भाजी पाला विक्रेते, रस्त्यावर अकारण फिरणारे, वाहने तपासणी मोहीम सुरू केली. महात्मा फुले चौक, पांढुरणा चौक येथे कसून चौकशी करण्यात आली.
ही दुकाने सील
शहरातील मंगलम गिफ्ट्स, जगदंबा स्टोअर, आनंद मेन्स कलेक्शन, सायली स्टील, संस्कृती रेडिमेड, रोशन रेडिमेड, बालाजी मेटल या सात दुकानांना सील ठोकण्यात आले, तर यशवंत उपहारगृह, चक्रधर उपहारगृह आणि महावीर उपहारगृह चालकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यावेळी एसडीओंसह सर्व अधिकाऱ्यांनी हातात काठ्या घेऊन रस्ते निर्मनुष्य केले, तर शहरातील पेट्रोल पंपसुद्धा बंद करण्यात आला. एसडीओ नितीनकुमार हिंगोले यांच्या नेतृत्वात ही धडक कारवाई करण्यात आली.