अमरावती : पाण्याचा प्रत्येक थेंब लाख मोलाचा असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्यावतीने (मजीप्रा) केला जाणार्या पाणीपुरवठय़ादरम्यान शहरात ठिकठिकाणी जलवाहिन्या लिकेज असल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. परिणामी पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी ही यंत्रणा अपयशी ठरल्याचे दिसून येते. बडनेर्यात गत आठवड्यापासून जलवाहिनी लिकेज असल्याने आतापर्यंत लाखो लिटर पाणी वाया गेले आहे.पावसाळा येऊन ठेपला असताना अजूनही पाणी टंचाईची समस्या कायम आहे. ग्रामीण भागात टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. एवढेच नव्हे , यापूर्वी बडनेरा शहरात दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र लोकप्रतिनिधी व जनतेच्या रेट्यामुळे मजीप्राला एकदिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय मागे घेत आता बडनेर्यात उपलब्ध व्यवस्थेनुसार दररोज पाणीपुरवठा करण्याचा प्रसंग उद्भवला आहे. हल्ली बडनेरा शहरात एकाच जलकुंभावरून जुनीवस्ती आणि नवी वस्ती या भागात पाणीपुरवठा करावा लागत आहे. हे करीत असताना मजीप्राची कसरतदेखील होत आहे. मात्र बडनेर्यातील नवी वस्ती परिसरातील राजेश्वर युनियन हायस्कूलच्या पाठीमागे असलेल्या जलकुंभालगत अगदी हाकेल्या अंतरावर असलेले जलवाहिनीचे लिकेज कर्मचार्यांना दिसू नये, ही आश्चर्याची बाब समजली जात आहे. जलकुंभ असलेल्या या ठिकाणी मजीप्राचे कार्यालय असून येथे कर्मचारी वर्गसुध्दा कार्यरत आहे. काही दिवसांपासून जलवाहिनी लिकेज असल्याने आतापर्यंत लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. या परिसरातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी, कर्मचार्यांचा सतत वावर असतानासुध्दा हे लिकेज बंद करण्यात आले नाही. त्यामुळे जीवन प्राधिकरणचा कारभार कसा सुरू आहे, हे निदर्शनास येते. गत आठवड्यात आ. रवी राणा यांनी पाणी टंचाईसदृश उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेता बडनेर्यात टँकरने पाणी वाटप केले, हे विशेष. बडनेर्यातील नागरिक पाणी समस्येने त्रस्त असून पाण्याचा होणारा अपव्यय थांबविण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
बडनेर्यात आठवड्यापासून लाखो लिटर पाणी वाया
By admin | Published: June 07, 2014 11:39 PM