अमरावती: भारत सरकार तर्फे २ जानेवारी १९६१रोजी महाराष्ट्र पोलीस दलाला पोलीस ध्वज प्रदान करण्यात आला होता. त्या अनुषंगाने २ ते ८ जानेवारी दरम्यान महाराष्ट्र पोलीस दलातर्फे पोलीस वर्धापन दिन साजरा केला जातो. यामध्ये विविध उपक्रम राबवून जनजागृती केली जाते. त्या मालिकेत अमरावती शहर पोलीस दलातर्फे शहरातील नागरिकांसाठी ‘अवेरनेस ऑन व्हील’ व ‘स्मार्ट ई- बिट सिस्टिम’दोन आधुनिक तंत्रज्ञान युक्त उपक्रम सुरु करण्यात आले आहेत. शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या कल्पक नेतृत्वातून हे दोन नवोपक्रम साकारले गेले आहेत.
‘वेरनेस ऑन व्हील’ या प्रकल्पातील वाहन सिसिटिव्ही सरव्हायलंस’ युक्त असून त्यावर एलईडी स्क्रीनद्वारे सायबर गुन्हे जनजागृती, महिला व बालकांविषयी संरक्षण कायद्याची माहिती तसेच नागरिकांसाठी पोलीस विभागातील सुविधांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच शहरात घडणारे विविध आंदोलने, मोर्चे, सभा तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या प्रसंगी प्रभावी पर्यवेक्षण ठेवण्याकरीता या वाहनाचा उपयोग होणार आहे.
‘स्मार्ट ई- बिट सिस्टिम’मध्ये ‘एआय’
‘स्मार्ट ई- बिट सिस्टिम’मध्ये बिट मार्शल पेट्रोलिंगचे सनियंत्रण तसेच व्यवस्थापन केले जाणार आहे. त्यासाठी एआय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ व ‘जिओ टॅगिंग’ची मदत घेण्यात येणार आहे. या प्रकल्पा अंतर्गत शहरातील महत्वाचे ठिकाणे शाळा, महाविद्यालये गुन्हे प्रवण ठिकाण व निर्जन स्थळावर पोलिसांचा सतत वावर व अस्तित्व उपलब्ध होणार आहे.