नरेंद्र जावरे लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : शहराची तहान भागविणारा इंग्रजकालीन सक्कर तलाव दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कासवगतीच्या कामाने पावसाळा तोंडावर असताना अपूर्ण आहे. जानेवारी महिन्यापासूनच शहरात दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. अशात संबंधित विभाग आणि कंत्राटदाराची मनमानी व नियमबाह्य सुरू असलेले काम नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करणारे ठरले आहे.शहरातील सक्कर तलावामधून पावसाळ्यातही लिकेजमुळे पाणी वाहून जाते. परिणामी ते पाणी थांबविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचे काम मागील दोन वर्षांपासून अचलपूर येथील मध्यम व लघु पाटबंधारे विभागांतर्गत सुरू आहे. परंतु, संबंधित विभागाच्या वेळकाढू आणि भ्रष्ट प्रवृत्तीमुळे दोन महिन्याच्या कामाला दोन वर्षे लावल्याचा संतापजनक प्रकार नगरवासीयांच्या जिव्हारी लागणारा ठरला आहे. मागील दहा वर्षापासून विदर्भाचे नंदनवन व पर्यटकांचा ओढा कायम असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळाचा घसा कोरडा आहे.
नव्याने निविदा, ५० लाखांनी बजेट वाढलेयंदा पुन्हा सक्कर तलावाचे काम अर्ध्यातून पूर्ण करण्यासाठी नव्याने निविदा बोलावण्यात आल्या. त्यामध्ये संबंधित विभागाने प्रचंड वेळ घेतला. परिणामी मे महिना उजाडला आणि आता कामाला सुरुवात झाली. यादरम्यान वर्ष वाढताच ५० लाखांनी बजेट वाढले.
जानेवारीतच केला तलाव खालीतलावाचे उर्वरित पुढील काम करण्यासाठी जानेवारी महिन्यातच तत्काळ तलाव रिकामा करण्याचे आदेश देण्यात आले आणि पाणीपुरवठा विभागाने तलाव रिकामासुद्धा केला. शहरवासीयांना तेव्हापासूनच दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाला. प्रत्यक्षात काम सुरू व्हायला मे महिना उजाडला.
थातूरमातूर काम आणि कंत्राटदाराचे पलायन सक्कर तलाव पाणीपुरवठा करणारा मुख्य तलाव आहे. त्याच्या प्रमुख भिंतीला लीकेज असल्याने १ कोटी ८३ लाखांच्या जवळपास निधी शासनाने मंजूर केला. गतवर्षी संबंधित विभागामार्फत कामाला सुरुवात झाली; परंतु आवश्यक असलेली काळी माती करजगाव आणि मुरुम गंगाधरी व कविठा खदानीमधून (लीड) देण्यात आली. संबंधित कंत्राटदाराने जवळपास काळी माती आणि मुरुमाचा शोध घेतला; परंतु इको-सेन्सिटिव्ह झोन असल्याने प्रशासनाने नियमावर बोट ठेवले आणि चिखलदरा तहानलेले राहिले. ५० लाखांपेक्षा अधिक काम करून कंत्राटदाराने पुढील काम करण्यास असमर्थता दर्शविली व पळ काढला.
प्रक्रिया सुरू झाली आहे. तातडीने काम सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. निविदा प्रक्रिया करण्यात विलंब झाला.- चैतन्य खंडारे, उपअभियंता, अचलपूर