चिखलदरा तहानले : फिल्टर प्लॉन्टचे भिजतघोंगडे, गुरुवारी पाणी कपातनरेंद्र जावरे चिखलदाविदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळावर उन्हाळ्याची चाहूल लागताच गंभीर जलसंकट ओढावण्याची भीती वर्तविण्यात आली येत आहे. आठवड्यातून एक दिवस पाणी कपात करण्यासोबत पुढे एक दिवसाआड शहरवासीयांना पाणीपुरवठा होणार आहे. फिल्टर प्लॉन्ट अभावी पाणीपुरवठा विभागातर्फे अशुध्द पाणीपुरवठा सुरू आहे. विदर्भातील एकमेव आणि तेही उपेक्षित असे पर्यटन स्थळ म्हणून चिखलदऱ्याची आतापर्यंत परवड झाली आहे. गत महिन्यात पर्यटन महोत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येऊन गेलेत. सिडकोसाठी पाचशे कोटी रुपयांचा पहिला टप्पा, मंजूर करण्यात आला. अधिकाऱ्यांची नियुक्तीसुध्दा झाली आणि याच सिडकोंतर्गत चिखलदऱ्याची कायम पाणी समस्या सोडविणारा ‘बरमासत्ती प्रकल्प’ आहे. परंतु सिडकोचा नकाशा, सर्वेक्षण, हरकती, न्यायालयीन अडथळे, मंजूर नकाशात पुन्हा फेरबदल याच कारणांत अडकला आहे. चिखलदऱ्याचे अच्छे दिनसाठी सिडकोला किमान १० वर्षे लागतील असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. बरमासत्तीचे भूमिपूजन होणार ?चिखलदऱ्याची तहान भागविण्यासाठी प्रस्तावित बरमासत्ती प्रकल्पाचा शुभारंभ होणे अत्यंत गरजेचे आहे. येत्या महिन्यात त्याचे भूमिपूजन करून प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली तरच दोन वर्षांनंतर चिखलदऱ्याला कायमस्वरुपी पाणीपुरवठा होणार आहे. अन्यथा सिडकोच्या संथगतीने नेहमीच येतो उन्हाळा याप्रमाणे मागील दहा वर्षांपासून जलसंकटाचे ढग कायम आहे. अमरावतीचे आ. सुनील देशमुख यांचे चिखलदऱ्यावर विशेष प्रेम आहे. त्यांनी कामाला गती मिळावी, यासाठी समिती घेऊन पाहणी केली. आता प्रत्यक्षात किमान बरमासत्तीच्या कामाला सुरूवात झाली तर चिखलदरा व पर्यटन स्थळावर येणारे पर्यटक सुखावणार आहेत.कालापानी, सक्कर तलाव आटलेचिखलदरा शहरात केवळ ८५० नळ कनेक्शन ग्राहक असून दरडोई आठ लक्ष लिटर पाणी या शहराला लागते. त्यासाठी इंग्रजकालीन असलेले सक्कर तलाव, कालापाणी व सहा किलोमीटर अंतरावरील आमझरी येथून पाणीपुरवठा केला जातो. मात्र कालापानी व सक्कर तलावात मोजकाच जलसाठा आहे. आमझरी येथील पाण्याची पातळी खाली गेल्याने बोअरवेलला पाणी येत नाही. उन्हाळ्याची चाहूल लागताच आठवड्यातून एक दिवस गुरूवारी पाणी कपातीचा निर्णय जीवन प्राधिकरण विभागाने घेतला आहे. पुढे एक दिवसआड अर्थात आठवड्यातून चार दिवस पाणीपुरवठा होणार आहे. जून महिन्यापर्यंत पाणीपुरवठा विभागाला ही कपात करावी लागणार आहे. चार महिने पिण्याचे पाणी अदबीने वापरण्याची जबाबदारी शहरवासीयांची आहे. चिखलदरा पर्यटनस्थळाला वाढीव पाणीपुरवठ्याची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांना या समस्येबद्दल विशेष लक्ष घालण्याची विनंती करण्यात आली आहे. - राजेंद्र सोमवंशी, नगराध्यक्ष, नगरपरिषद, चिखलदरा उपयुक्त जलसाठा अपुरा पडत असल्याचे पाहता जून महिन्यापर्यंत नागरिकांना पाणी मिळावे यासाठी आठवड्यातून एक दिवस व नंतर एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव शासनाकडे तीन वर्षांपूर्वी सादर करण्यात आला आहे. - मोरेश्वर आजणे, उपअभियंता, जीवन प्राधिकरण विभाग, चिखलदरा.
नंदनवनावर जलसंकट
By admin | Published: March 05, 2016 12:13 AM