- गजानन मोहोड
अमरावती - सरासरीपेक्षा कमी पावसाने यंदा अमरावती विभागातील ५६ पैकी ५२ तालुक्यांतील भूजलपातळी २० फुटांपर्यंत घटली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने जानेवारी अखेरीस ६८० निरीक्षण विहिरींतील स्थिर पाणीपातळीच्या नोंदी घेतल्या व त्याआधारे पाच वर्षांच्या तुलनात्मक नोंदीद्वारे हे निरीक्षण नोंदविले आहे. पावसाळ्यात अमरावती विभागात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत ७७८ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असतांना प्रत्यक्षात ६६३ मिमी पावसाची नोंद झाली. ही टक्केवारी ८५ आहे. अकोला व वाशिम जिल्ह्याने सरासरी पार केली असली तरी अमरावती जिल्ह्यात ७७ टक्के, यवतमाळ ७८ व वाशिम जिल्ह्यात ६९ टक्के पाऊस कोसळला. त्यामुळे ५२ तालुक्यांत भूजलपातळी २० फुटापर्यंत घटली आहे. भूजलाचे पुनर्भरण पुरेसे न झाल्याने या तालुक्यांमध्ये ही स्थिती ओढवली. तथापि, यवतमाळ जिल्ह्यातील चार तालुक्यांत एक मीटरपर्यंत पाणीपातळीत वाढ झालेली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाच्या माहितीनुसार, ५६ तालुक्यांपैकी २६ तालुक्यांमध्ये एक मीटरपर्यंत, २० तालुक्यांमध्ये दोन मीटरपर्यंत व सहा तालुक्यांमध्ये तीन मीटरपेक्षा जास्त तूट आलेली आहे. अमरावती जिल्ह्यात १२, अकोला जिल्ह्यात सात, वाशिम जिल्ह्यात एक, बुलडाणा जिल्ह्यात १३, तर यवतमाळ जिल्ह्यात दोन तालुक्यांमध्ये भूजलात तूट आढळून आलेली आहे.
बसाल्ट खडकाने भूगर्भात पाणी साठवण क्षमता कमीविभागाची भूगर्भीय स्थिती पाहता, किमान ८२ टक्के भूभाग हा ‘बसाल्ट’ या कठीण या खडकाने व्यापला आहे. यात पाणी साठवण क्षमता कमी आहे. मात्र, यात भेगा व सांधे निर्माण झाल्याने थोडी फार साठवण होते. भूपृष्ठीय रचना व भूगर्र्भीय स्थितीवर झालेल्या पर्जन्यमानाचे भूजलात रूपांतर होणे महत्त्वाचे आहे. मात्र, या साठ्यातून सिंचन, औद्योगिक वापर, शहरीकरण व वाढत्या लोकसंख्येसाठी पाण्याची मागणी यामुळे भूजलाचा वारेमाप उपसा होत आहे. तालुक्यांची स्थिती गंभीरविभागात भूजलात सर्वाधिक ७.८३ मीटरने घट अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात आलेली आहे. अकोट ४.०८ व बाळापूर ३.४६, अमरावती जिल्ह्यात अचलपूर तालुक्यात ५.९८, चांदूर बाजार ४.१८, दर्यापूर ३.८५ मीटर, तर उर्वरित तालुक्यात दोन मीटरपर्यंत तूट आलेली आहे. याव्यतिरिक्त यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा, महागाव, मारेगाव व आर्णी या तालुक्यात भूजल पातळी सरासरीइतकीच स्थिर आहे.