गजानन मोहोड
अमरावती : सरासरीपेक्षा कमी पावसामुळे विभागात जानेवारीतच प्रकल्प पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. ४८४ प्रकल्पांमध्ये सध्या ३४ टक्केच साठा आहे. यामध्ये १० टक्के मृत साठा गृहीत धरता, आगामी काळासाठी ही धोक्याची घंटा आहे. ४५२ लघू प्रकल्पांमध्ये २४ टक्केच साठा असल्याने भीषण स्थिती ओढावणार आहे. विशेष म्हणजे, गेल्या पाच वर्षांत यंदा जानेवारीतच सर्वात कमी साठ्याची नोंद झाली आहे.
विभागात नऊ मुख्य प्रकल्प आहेत. यामध्ये सध्या ६०३.४५ दलघमी पाणीसाठा आहे. ही टक्केवारी ३९ आहे. यामध्ये अमरावतीच्या ऊर्ध्व वर्धा प्रकल्पात ६९ टक्के, तर अकोला जिल्ह्यातील वान प्रकल्पात ८९ टक्के साठा आहे. पूस १९.७७, अरुणावती १३.०७, बेंबळा १६.५९, काटेपूर्णा १३.८६, नळगंगा २९.१४ व पेनटाकळी प्रकल्पात २५.७१ टक्के साठा आहे. या सर्व मुख्य प्रकल्पांमध्ये जानेवारी २०१७ मध्ये ५७२.२६ दलघमी, २०१६ मध्ये ७६८.०९ दलघमी, सन २०१५ मध्ये १०१७.६६ दलघमी, तर २०१४ मध्ये ७६४.७४ दलघमी साठा होता. त्या तुलनेत यंदा ६०३.४५ दलघमी साठा उपलब्ध आहे.
विभागात २३ मध्यम प्रकल्प आहेत. यामध्ये सद्यस्थितीत २५२.०६ दलघमी म्हणजेच ३८.३२ टक्के साठा आहे. अमरावती जिल्ह्यातील शहानूर ६० टक्के, चंद्रभागा ६१, पूर्णा ७४, सपन ७०, यवतमाळ जिल्ह्यात अधरपूस ५१, सायखेडा ६८, गोकी ११, वाघाडी १२, बोरगाव ११, नवरगाव ३७, अकोला जिल्ह्यात निगुर्णा ५८, मोर्णा १४, उमा ३, अडाण २१, सोनल ०.४१, एकबुर्जी २३, वाशिम जिल्ह्यात ज्ञानगंगा ४७, पलढग ७२,मस १४, कोराडी १४, मन १६, तोरणा २२, तर उतावळी प्रकल्पात २९ टक्के साठा आहे. या सर्व प्रकल्पांत २०१७ मध्ये ३१३, सन २०१६ मध्ये ३८७, सन २०१५ मध्ये ५१८ तर २०१४ मध्ये ४१० दलघमी साठ्याची नोंद आहे. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा जानेवारीतच सर्वात कमी साठा असल्याने आगामी काळासाठी ही धोक्याची घंटा आहे.
५० टँकरने पाणीपुरवठा-विभागातील आठ तालुक्यांतील ६१ गावांमध्ये १३ शासकीय व ३७ खासगी अशा एकूण ५० टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये अकोला जिल्ह्यात ४१, यवतमाळ जिल्ह्यात ७ व बुलडाणा जिल्ह्यात २ टँकर लागले आहेत. यंदाच्या हंगामात सरासरीपेक्षा २४ टक्के पाऊस कमी झाल्याने पाण्याची पातळी आॅक्टोबरमध्येच दोन मीटरपेक्षा अधिक खोल गेली. त्यामुळे आगामी काळात पाणीटंचाईची झळ मोठ्या प्रमाणात बसणार आहे.