अमरावती : जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पावसाने यंदा पाणीटंचाईची समस्या तीव्र राहणार आहे. भूजल पुनर्भरण न झाल्याने भूजलस्तरात कमी आलेली आहे. त्यामुळे पाणीटंचाईच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात जूनअखेरपर्यंत ९६८ गावात जलसंकट गहिरे होण्याची शक्यता आहे. यातून सावरण्यासाठी ११०२ उपाययोजनांची मात्रा राहणार आहे. यावर किमान २१ कोटींचा निधी खर्च होण्याची शक्यता आहे.
पावसाळ्याच्या चार महिन्यात चांदूरबाजार वगळता उर्वरित १३ तालुक्यात सरासरी ३१ टक्के पावसाची तूट आहे. त्यामुळे भूजलाचे पुरेसे पुनर्भरण झालेले नाही. विशेष म्हणजे, पुनर्भरण होणाऱ्या ऑगस्ट महिन्यात २१ ते २५ दिवस पावसाचा खंड राहिला आहे. त्यामुळे भूजलस्तर घटले आहे. अशा परिस्थितीत मार्चअखेर ४८५ व एप्रिल ते जूनअखेर ४८३ गावांमध्ये जलसंकट उद्भवण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली.