चांदूर रेल्वे (अमरावती) : तालुक्यातील सावंगी मग्रापूर गावातील वॉर्ड क्र. १ मधील रहिवाशांनी घराच्या नळाला पाणी पोहोचल्याने तिसऱ्या दिवशी आंदोलन मागे घेतले. एक महिन्यापासून पाणी मिळत नसल्याने गावाबाहेर पाणीपुरवठ्याच्या स्रोताजवळ ठिय्या मांडणाऱ्या ग्रामस्थांची मागणी मान्य करीत प्रशासनाने तीव्र गतीने या वॉर्डात शुक्रवारी स्टँड पोस्ट उभारून पाणी पुरविले.
अनुसूचित जाती बहुल वॉर्ड १ मधील पाणीपुरवठा बंद केल्याचा आरोप करीत महिला-पुरुष ग्रामस्थांनी २ फेब्रुवारी रोजी रात्री गाव सोडून आंदोलनाचे हत्यार उपसले होते. शुक्रवारी प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर सायंकाळी ४.३० वाजता हे आंदोलन मागे घेण्यात आले. उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. गटविकास अधिकारी मंदार पत्की, पोलीस निरीक्षक मगन मेहते, सहायक गटविकास अधिकारी सुधाकर उमप, निवासी नायब तहसीलदार अनासाने याप्रसंगी उपस्थित होते.
पालकमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक
आंदोलकांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्यासह स्थानिक प्रशासकीय यंत्रणा व ग्रामस्थ यांची जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी रात्री तातडीची बैठक बोलावली होती. बैठकीत सर्व समस्या निकाली काढण्याचे आश्वासन दिले. यामुळे तोडग्याला दिशा मिळाली.
वीरेंद्र जगताप यांची मध्यस्थी
माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या मध्यस्थीनंतर तिसऱ्या दिवशी आंदोलन मागे घेण्याची चिन्हे स्पष्ट झाली. त्यांनी स्वत: उपस्थित राहून पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्याशी ग्रामस्थांचे दूरध्वनीवरून बोलणे करून दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांचे समाधान झाले.
आता लवकरच कायमस्वरुपी उपाययोजनेद्वारे सर्वांच्या घरगुती नळाला पाणी पोहोचले. दलित वस्तीत सुरक्षिततेसाठी पोलिसांचा पुढील २४ तास चोख बंदोबस्त राहील
मंदार पत्की, गटविकास अधिकारी