- संदीप मानकरअमरावती - पश्चिम विदर्भातील ५०२ प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे सरासरी १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. जलसंपदा विभागाने नोंदविलेल्या ५ आॅगस्ट सकाळ ७ वाजेपर्यंतच्या नोंदीनुसार धरणांत २५.३७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यामध्ये नऊ मोठ्या प्रकल्पांमध्ये पाणीसाठ्यात काही प्रमाणात वाढ होऊन २३.७८ टक्के पाणीसाठा साचला आहे. २४ मध्यम प्रकल्पांत ४२.०१ टक्के पाणीसाठा असून, ४६९ लघु प्रकल्पांत सहा टक्क्यांनी पाणीसाठ्यात वाढ होऊन आता १७.१३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गत आठवड्यापासून रिमझिम तथा मध्यम व काही ठिकाणी दमदार कोसळत असलेल्या पावसांमुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. हजारो शेतक-यांनी दुबार पेरणी केली आहे. नेमकी किती शेतकºयांनी दुबार पेरणी केली, या संदर्भाची माहिती कृषी विभाग घेत असल्याची माहिती आहे. २९ जुलै रोजी मोठे, मध्यम व लघु असे एकूण ५०२ प्रकल्पांत १५.०२ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. यानंतर झालेल्या सार्वत्रिक दमदार पावसामुळे सद्यस्थितीत २५.३७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. म्हणजे १०.३५ टक्क्यांनी सरासरी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. २४ मध्यम प्रकल्पांचा पाणीसाठा हा २०.३६ टक्क्यांनी वाढला, तर लघु प्रकल्पांच्या साठ्यात फारशी वाढ झाली नसली तरी ६.६५ टक्क्यांनी पाणीसाठा वाढला आहे. आठवडाभरापूर्वी मोठ्या नऊ प्रकल्पांत १५.३८ टक्के पाणीसाठा होता, तर २४ मध्यम प्रकल्पांत २१.६५ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. ४६९ लघु प्रकल्पांत १०.४८ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. त्याकारणाने नागरिकांना पाणीसाठा वाढले की नाही, यासंदर्भाची चिंता लागली होती.यंदा मध्यम प्रकल्पांत काही प्रमाणात चांगला पाणीसाठा साचला असून, अद्यापही १५ मध्यम प्रकल्पांत ५० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली. आठ प्रकल्पांत मात्र ६० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा साचला आहे. त्याकारणाने अनेक तालुक्यांची यंदाची पिण्याच्या पाण्याची समस्या मिटली आहे. नऊ मोठ्या प्रकल्पांची स्थिती अमरावती जिल्ह्यातील उर्ध्व वर्धा प्रकल्पांत सद्यस्थितीत १९.३१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्पात ३२.७७ टक्के, अरुणावती प्रकल्पात १०.९२ टक्के, बेंबळा प्रकल्पात सर्वाधिक ५६.१० टक्के पाणीसाठा, अकोला जिल्ह्यातील वान प्रकल्पात ४८.५९ टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात ११.३१ टक्के, पेनटाकळी प्रकल्पात ३६.३० टक्के, खडकपूर्णा शून्य टक्के पाणीसाठा आहे. मोठ्या नऊ प्रकल्पाची प्रकल्पीय संकल्पीत उपयुक्तसाठा हा १३९९.९१ दलघमी आहे. आजचा उपयुक्त पाणीसाठा हा ३३२.९६ दलघमी आहे.
पश्चिम विदर्भातील प्रकल्पांचा पाणीसाठा १० टक्क्यांनी वाढला, मात्र मोठे प्रकल्प तहानलेलेच
By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2019 7:15 PM