जितेंद्र दखने अमरावतीजिल्ह्यात सध्या दुष्काळ असून उन्हाळ्याच्या दिवसात भासणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने सुमारे ६३४.५० लाख रुपयांचा पाणी टंचाईचा आराखडा तयार केला होता. यावर जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी शिक्कामोर्तब केला आहे. दरवर्षी जिल्ह्यात आॅक्टोबर ते डिसेंबर, जानेवारी ते मार्च व एप्रिल ते जून अशा तीन टप्प्यांत पाणी टंचाईची समस्या भेडसावत असते. त्यामुळे या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून संभाव्य पाणी टंचाईग्रस्त गावांच्या प्रस्तावित कामे व उपाययोजनांचा कृती आराखडा तयार केला जातो. यावर्षीही पाणी टंचाईचा पहिला टप्पा आटोपला असताना आता जानेवारी ते मार्च व एप्रिल ते जून या दोन टप्प्यात जिल्ह्यातील ज्या गाव व वाड्या तसेच वस्त्यांमध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण होऊ शकते, अशा ठिकाणी उपाययोजना करण्यासाठी तीनही टप्प्यातील संयुक्त आराखडा तयार करण्यात आला होता. या आराखड्यानुसार जानेवारी ते मार्च या कालावधीत १४६ गावे व वाड्यांमध्ये १५१ उपाययोजना केल्या जाणार असून यासाठी संभाव्य खर्च ३००.४६ लाख रुपये अपेक्षित आहेत. तर एप्रिल ते जून या कालावधीत २५३ गावे व वाड्यांमध्ये २७२ पाणी टंचाईसाठी विविध उपाययोजना करिता ३३४.०४ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे संभाव्य गावातील पाणी टंचाईवर त्वरित मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने हा आराखडा तयार करुन तो कार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा विभाग, वरिष्ठ भूवैज्ञानिक व त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांनी या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केल्यावर सुमारे ६३४.५० लाख रुपयांचा कृती आराखडा जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. या कृती आराखड्याला जिल्हाधिकाऱ्यांनी अंतिम मंजुरी दिली असल्याने संभाव्य टंचाईग्रस्त गावांमध्ये उपाययोजना करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पाणी टंचाई, ६३४ लाखांचा आराखडा
By admin | Published: January 17, 2015 12:51 AM