निवेदन; ग्रा.पं.पदाधिकाऱ्यांची तिढा सोडविण्याची मागणी
अमरावती : दर्यापूर तालुक्यातील सासन येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. गावात एकच पाण्याची टाकी असून तांत्रिक चुकीमुळे गावाला पाणी मिळत नसल्याची तक्रार करीत ग्रामस्थांनी १२ एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे तिढा सोडविण्याची मागणी केली.
सासन रामापूर तसेच सासन बुद्रुक अशा दोन गावांना एकाच टाकीवरून पाणीपुरवठा केला जातो. मात्र शासन रामापूर हे गाव वरच्या भागाला, तर शासन बुद्रुक हे गाव खालच्या भागाला असल्याने टाकीतून पाणी या गावाला मुबलक प्रमाणात मिळते. मात्र, रामापूरवासीयांना पाच ते सहा दिवसांतून एकदाच पाणी मिळत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. विशेष म्हणजे चार ते पाच वर्षांपासून गावकऱ्यांची पाण्यासाठी ओरड आहे. यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यामुळे येथील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांच्याकडे हा विषय मांडून न्यायाची मागणी केली. यावेळी उमेश ढोणे, सासनचे सरपंच विनोद सोनोने, उपसरपंच रवींद्र पाचपोहे, बबनराव पाचपोहे, सुभाष सोळंके, मीना काळबांडे, कमला गिऱ्हे, खैरुन्निसा साजिद खान आदी पदाधिकारी उपस्थित होते.
बॉक्स
पाणी पेटले
केवळ सासन नव्हे तर जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये पाण्याची टंचाई भेडसावत आहे. जिल्हा परिषदेचा पाणीपुरवठा विभाग उपाययोजना करीत असल्याचा दावा करीत आहे. मात्र, अद्याप अनेक गावे तहानलेली आहेत. यात चिखलदरा तालुक्यातील बहुसंख्य गावांत सध्या पाणीटंचाई जाणवत आहे. पुढील काळात तीव्र टंचाईचे संकेत आहे.