गजानन मोहोड
अमरावती - गतवर्षीच्या सरासरीपेक्षा कमी पावसामुळे सद्यस्थितीत पश्चिम विदर्भातील ४९ तालुक्यांच्या भूजलस्तरात कमी आलेली असल्याने एप्रिल अखेर ११४० गावांमध्ये पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. निवारणार्थ १७८९ उपाययोजनांना मंजुरी दिली असली तरी सद्यस्थितीत १४५३ उपाययोजना पूर्ण झाल्या असल्याची प्रशासनाची माहिती आहे. आचारसंहितेमध्ये शिथिलता देण्यात आल्याने २ व ४ मे रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात बैठकांचा रतीब सुरू आहे, तर सचिवस्तरावर दोन वेळा व्हीसीद्वारे आढावा घेण्यात आला आहे.
आचारसंहितेच्या काळात निविदा प्रक्रिया न होऊ शकल्याने अनेक योजनांना कार्यारंभ आदेश प्रशासन देऊ न शकल्याने शासनस्तरावर प्रस्ताव पाठविण्यात आले. मात्र, या प्रस्तावांना मान्यता मिळालेली नाही. विभागाचा मागील वर्षीचा २१ कोटी ५९ लाख ९३ हजारांचा निधी अखर्चिक राहिल्याने खर्च करण्यासाठी शासनाकडे परवानगी मागण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाने दिली.
प्रशासनाच्या संयुक्त कृती आराखड्यानुसार अमरावती विभागात पाणीटंचाई निवारणार्थ ५९११ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक २१६७, अमरावती १९३९, यवतमाळ ७५५, अकोला ५६९ व वाशिम जिल्ह्यात ४८१ उपाययोजनांचा समावेश आहे.मात्र, आरखड्यानुसार १७८९ उपाययोजनांना मंजुरी देण्यात आली. यावर १७ कोटी ८९ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यात ३१०, अकोला २२१, यवतमाळ ४३, बुलडाणा ११०५ व वाशीम जिल्ह्यातील ११० योजनांचा समावेश आहे. सद्यस्थितीत ३८० योजना प्रगतीपथावर असल्याचे सांगण्यात आले. यामध्ये अमरावती जिल्ह्यात २३१, अकोला १३५ यवतमाळ ८१, बुलडाणा ८९० व वाशिम जिल्ह्यात ११६ उपाययोजनांचा समावेश आहे. यावर १४ कोटी ५३ लाखांचा निधी आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. उन्हाची दाहकता वाढत असल्याने दिवसेंदिवस जलसंकट तीव्र होत असल्याचे वास्तव आहे.
२३६ टँकर सुरू, ८९१ विहिरी अधिग्रहीत
विभागात सद्यस्थितीत २३६ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये सर्वाधिक १८८ टोंकर बुलडाणा जिल्ह्यात सुरू आहे. अमरावती व यवतमाळमध्ये प्रत्येकी १९, वाशीम ८ व अकोला जिल्ह्यात २ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. सद्यस्थितीत ८९१ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहेत. यामध्ये सर्वाधिक बुलडाण्यात ५५७ विहिरींचा समावेश आहे. अमरावती ११० अकोला ५४, यवतमाळ ६२ व वाशीम जिल्ह्यात १०८ विहिरींचा समावेश आहे.