तिवसा : तालुक्यातील १६ गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाच्यावतीने ११ टँकरने पाणी पुरविले जात आहे. प्रशासनाने एक बोअर व १८ विहिरींचे अधिग्रहण केले आहे.तिवसा, गुरुकुंज मोझरी या दोन मोठ्या गावांसह तालुक्यातील अनेक गावांना वर्धा नदीपात्रातून पाणीपुरवठा होत होता. मात्र, दोन वर्षांत कमी पाऊस झाल्याने व वर्धा नदीला प्रथमच कोरड पडल्याने तिवसा, गुरुकुंज मोझरीचा पाणीपुरवठा प्रभावित झाला आहे. तालुक्यातील तिवसा, पालवाडी, अनकवाडी, आखतवाडा, बोर्डा, मार्डी, भिवापूर, विरगव्हाण, मोझरी, शिरजगाव मोझरी, शेंदोळा खुर्द, शेंदोळा बु, तळेगाव ठाकूर, निंबोरा, शेंदूरजना बाजार, अनकवाडी या ग्रामपंचायतीने शासनाकडे टँकरची मागणी केली होती. त्यामुळे शासनाच्यावतीने ११ टँकरने पाणीपुरवठा होत आहे. तालुक्यातील विहिरी, बोअर व नदी नाले, तलाव कोरडे पडले आहेत. त्यामुळे तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी हाहाकार माजला आहे. तिवसा शहरात नगरपंचायतीने पाण्याचा टँकर विकत घेतल्याने तेथील सर्व प्रभागात दिवसरात्र टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तिवसा येथे नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा आठ दिवसांवर गेला आहे. वर्धा नदीतील डोहात पाण्याच्या मोटारी टाकल्याने तिवसा येथे गढूळ पाणीपुरवठा होत आहे.
तिवसा तालुक्यातील १६ गावांमध्ये पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 10:30 PM
तालुक्यातील १६ गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाच्यावतीने ११ टँकरने पाणी पुरविले जात आहे. प्रशासनाने एक बोअर व १८ विहिरींचे अधिग्रहण केले आहे.
ठळक मुद्दे११ टँकरने पाणीपुरवठा, १८ विहिरींचे अधिग्रहण