अमरावती : सरासरीच्या २५ टक्के कमी पावसामुळे पश्चिम विदर्भात भूगर्भाचे पुनर्भरण झालेले नसल्याने भूजलात १२ फुटांपर्यंत कमी आलेली आहे. परिणामी जानेवारी ते जून या कालावधीत तीन हजार दोन गावांना पाणीटंचाई झळ पोहोचणार आहे. यासाठी ४३५१ उपाययोजना प्रस्तावित केलेल्या आहेत. यावर ६०.२० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. याबाबतचा कृती आराखडा विभागीय आयुक्तांनी शासनाला सादर केला.
अत्यल्य पावसामुळे यंदा गावागावांतील जलस्त्रोत आटायला सुरुवात झाली आहे. भूजल पातळीदेखील मोठ्या प्रमाणावर घटली आहे. लहान-मोठ्या ५०२ प्रकल्पांच्या साठ्यात घट झाल्याने आगामी काळात पाण्याचे दुर्भिक्ष राहणार असल्याचे वास्तव आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, विभागात पाणीटंचार्ईच्या पहिल्या टप्प्यात जानेवारी ते मार्च या कालावधीत १,८५२ गावांमध्ये पाणीटंचाईची धग जाणवणार आहे. यासाठी २९२८ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्यात. यावर ५१ कोटींचा निधी खर्च होणार आहे.
एप्रिल ते जून या कालावधीतील दुसऱ्या टप्प्यात ११५० गावांत पाणी टंचाई राहणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेद्वारा १३७३ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्यात. यावर ९.१२ कोटींचा निधी खर्च होणार आहे. कृती आराखड्यानुसार १५२ गावांध्ये ४४१ विहिरी खोल करण्यात येणार आहे. यावर १.९० कोटींचा खर्च होईल, २६५२ गावांत २८९७ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येईल. यावर २१.१२ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. ५२२ गावांतील ४८१ नळ योजनांची विशेष दुरूस्तीवर १५.९५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. ११०८ गावांमध्ये १३०८ नवीन विंधन विहिरी तयार करण्यात येईल. यावर १२.१८ कोटी व २३४ गावांमध्ये २०२ तात्पुरत्या पूरक नळ योजनांच्या दुरूस्तीसाठी ९.३५ कोटींचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाने दिली.
५०२ प्रकल्पांत ३८ टक्केच जलसाठा
- विभागात नऊ मुख्य प्रकल्प आहेत. यामध्ये सद्यस्थितीत ३५ टक्के जलसाठा आहे. २४ मध्यम प्रकल्पांत ५१ टक्के जलसाठा आहेत, तर ४६९ लघु प्रकल्पांत ३५ टक्के जलसाठा आहे. एकूण ५०२ प्रकल्पांत ३६ टक्के जलसाठा आहे. यामध्ये १० टक्के मृतसाठा गृहित धरता मार्चअखेर प्रकल्प कोरडे पडण्याची शक्यता आहे. विभागात बुलडाणा जिल्ह्यातील प्रकल्प आताच कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत.
- विभागात सद्यस्थितीत अमरावती जिल्ह्यात ५१, अकोला चार व बुलडाणा जिल्ह्यात १२१ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे. तसेच अमरावती जिल्ह्यात १ व बुलडाणा २७ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.