अमरावती : यंदा अपेक्षेप्रमाणे मार्च महिन्यापासूनच ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. यामध्ये नांदगाव खंडेश्वर आणि मोर्शी या दोन तालुक्यातीलच १० तर उर्वरित ७ तालुक्यातील १२ गावांचा यात समावेश आहे. या गावातील नागरिकांना पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्यासाठी पाणीटंचाई आराखड्यामधून २२ गावांत विहीर अधिग्रहण करून पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये ६ विंधन विहीर आणि १६ खासगी विहिरींद्वारे तहान भागविली जात आहे. याशिवाय मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील आकी गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे एप्रिल व त्यानंतरच्या मे महिन्यातील परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यंदाचा पाणीटंचाई कृती आराखडा सुमारे १२ कोटी ४४ लाख रुपयांचा तयार करण्यात आला आहे. यामध्ये विविध योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. यंदा पावसाळा समाधानकारक झाला असला तरी पाण्याच्या साठवणुकीत प्रशासकीय यंत्रणा कमी पडते, असे दिसून येते. दरवर्षीप्रमाणे यंदासुद्धा चिखलदरा तालुक्यासोबत अन्य तालुक्यातील काही गावांना पाणीटंचाईची झळ सहन करावी लागणार आहे. जलजीवन मिशनअंतर्गत कोट्यवधी रुपयांची कामे केली जात असल्याचे बोलले जात असले तरी टंचाईची तीव्रता पाहता यंत्रणेकडून केला जात असलेल्या उपाययोजना केव्हा फायदेशीर ठरणार,असा प्रश्न उपस्थित होत आहे.
चिखलदरा तालुक्यातील १५ गावांना यंदा टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार आज स्थितीत आकी या गावाला टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. याशिवाय नांदगाव खंडेश्वर, मोर्शी, अमरावती, तिवसा, वरूड,चांदूर रेल्वे, चिखलदरा, अचलपूर, भातकुली, या ९ तालुक्यांमधील २२ गावातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी प्रशासनाकडून त्या गावातील विंधन विहीर व खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत ही संख्या वाढण्याची दाट शक्यताही वर्तविली जात आहे.
या आहेत उपाययोजना
नवीन विंधन विहिरी,नवीन हातपंप,खासगी विहिरींचे अधिग्रहण,नळयोजनाची विशेष दुरुस्ती, विहिरींचे व तलावांचे खोलीकरण, टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे.पाच तालुक्यात नाही टंचाई
जिल्ह्यातील धारणी, अंजनगाव सुजी, धामणगांव रेल्वे, चांदूर बाजार, दयार्पूर १४ पैकी या ५ तालुक्याचा टंचाईचा अपवाद सोडला तर उर्वरित ९ तालुक्यातील २२ गावात पाणीटंचाई भेडसावत असल्याने विहीर अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये अमरावती तालुक्यातील ४,नांदगाव खंडेश्वर ६,भातकुली १, तिवसा १, मोर्शी ४, वरूड १, चांदूर रेल्वे १, अचलपूर २, चिखलदरा २ अशाप्रकारे २२ गावांचा यात समावेश आहे.
पाणीटंचाई निवारणार्थ टंचाई आराखड्यानुसार कामांचे नियोजन केले जात आहे. टंचाईवर मात करण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी विंधन व खासगी विहीर अधिग्रहित केलेल्या आहेत. तसेच प्रस्तावित सर्व उपाययोजना करण्याचा पाणीपुरवठा विभागाचा प्रयत्न आहे.
- संदीप देशमुख, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग