अमरावती : पश्चिम विदर्भातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे तीन मोठ्या प्रकल्पांसह एकूण १८ प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये विभागातील सर्व सिंचन प्रकल्पांमधील पाणीसाठा हा ६५.६९ टक्क्यांवर पोहोचला आहे. अद्यापही पावसाळ्याचे दिवस शिल्लक असल्याने धरणांमधून पाणी सोडून देण्यात येत आहे. या विसर्गामुळे अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
अमरावती विभागातील सर्वांत मोठ्या अप्पर वर्धा धरणातील पाण्याची पातळी ३४१.२४ मीटरवर पोहोचली आहे. धरणामध्ये ४५५.८८ दशलक्ष घनमीटर जलसाठा (८०.८२ टक्के) झाला आहे. धरणाचे ५ दरवाजे हे २५ सेंटीमीटरने उघडण्यात आले असून, १९६ क्युसेक पाणी सोडले जात आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस आणि बेंबळा या प्रकल्पांमधूनही पाणी सोडण्यात येत असून, बेंबळा नदी दुथडी भरून वाहत आहे. बेंबळा प्रकल्पाचे २ दरवाजे २५ सेंमी उघडले आहेत. विसर्ग ४२ क्युसेक एवढा आहे.
पूस प्रकल्पातून १९.२५ घनमीटर प्रतिसेकंद विसर्ग सुरू आहे. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पाचे दोन दरवाजे २५ सेंमी उघडले आहेत. या धरणातून ४८.२२ क्युसेक विसर्ग सुरू आहे. पश्चिम विदर्भातील एकूण २७ पैकी १४ मध्यम प्रकल्पांतून विसर्ग सुरू आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील चंद्रभागा, पूर्णा, सपन, गर्गा तसेच यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस, सायखेडा, गोकी, वाघाडी, बोरगाव या प्रकल्पांमधून पाणी सोडण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यातील निर्गुणा, घुंगशी बॅरेज तसेच वाशिम जिल्ह्यातील अडाण, सोनल आणि बुलढाणा जिल्ह्यातील मस या मध्यम प्रकल्पांमधूनही विसर्ग सुरू आहे. मागील अनेक दिवसांपासून पश्चिम विदर्भात सर्वत्र जोरदार पाऊस पडला आहे. परिणामी पश्चिम विदर्भातील बहुतांश प्रकल्पांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. सर्वाधिक विसर्ग उर्ध्व वर्धा प्रकल्पातून होत आहे. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठची गावे तसेच वस्त्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.