लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची मुख्य जलवाहिनी रहाटगावनजीक पुन्हा फुटल्याने, ती दुरुस्त होण्यास शनिवारी मध्यरात्र उजाडेल. त्यामुळे अमरावतीकरांना सोमवारी पाणीपुरवठा होईल, असे संकेत उपकार्यकारी अभियंत्यांनी दिले आहेत. जलवाहिनीची दुरुस्ती करण्यासाठी अभियंते, कंत्राटदारांसह ३० जणांची चमू घटनास्थळी तळ ठोकून आहे. मात्र, मजीप्राच्या ढिसाळ कारभारावर नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.गत आठवड्यात पाच दिवस पाणीपुरवठा नाही. आता शनिवार, रविवार असे दोन दिवस पुन्हा जलवाहिनी लीकेजमुळे पाण्याचे नियोजन बिघडविले आहे. यंदा उन्हाळ्यात पाणीपुरवठा करण्यात मजीप्रा सपशेल अपयशी ठरल्याचे वास्तव आहे. किमान पावसाळ्यात तरी पाणीपुरवठा सुरळीत होईल की नाही, हेही गुलदस्त्यात आहे. फुटलेली जलवाहिनी दुरुस्तीची कामे शुक्रवारी दुपारी १२ वाजतापासून निरंतरपणे सुरू आहे. शनिवारी रात्री २ वाजता ही कामे पूर्ण झाल्यानंतर जलवाहिनीची तपासणी केली जाईल, असे मजीप्राचे उपअभियंता यांनी सांगितले. त्यानंतर, महानगरातील जलकुंभात पाणी भरण्यात येणार आहे. त्यानंतर, वेळापत्रकानुसार नागरिकांना सोमवारी पाणीपुरवठा केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. अमरावती महानगरातील जलकुंभात सिंभोरा येथून पाणी पोहोचण्यास वेळ लागेल, अशी माहिती आहे. जलहवाहिनी दुरुस्तीचे कामे वेगाने होण्यासाठी घटनास्थळी कार्यकारी अभियंता अजय लोखंडे यांच्यासह उपअभियंता, शाखा अभियंता, सहायक अभियंता, कंत्राटदारांसह मजूर वर्ग कार्यरत आहे.
महापालिकेत टँकरची वानवानऊ लाख लाेकसंख्येच्या महानगरात महापालिकेकडे पाण्यासाठी केवळ दोनच टॅंकर असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. पाण्यासाठी दाहीदिशा अशी स्थिती उद्भवली असताना प्रशासनाकडून ही बाब गंभीरतेने घेण्यात येत नाही. आता कुठे तरी आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी पाच नव्याने टॅंकर घेण्याचा निर्णय घेतला आहे. अमरावती महानगरात पाचही झोन अंतर्गत प्रत्येकी एक टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन आहे.
पाण्याच्या कॅन महागल्याकाही दिवसांपासून मजीप्राकडून पाणीपुरवठ्यात व्यत्यय येत असल्याने पाणी विक्रेत्यांनी ही बाब ‘कॅश’ करण्याला प्राधान्य दिले आहे. पाण्याच्या कॅनचे दर ३० रुपयांहून ४० ते ५० रुपये करण्यात आले आहे. मजीप्राचा पाणीपुरवठा नसल्याने नागरिकांना महागडे पाणी विकत घ्यावे लागत आहे. शहरातील काही भागात हँडपंपमध्ये पाणी मिळत नसल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप होत आहे. पुढील दोन दिवस पाण्यासाठी भटकंती होणार आहे.