चौकशीचे आदेश : जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत वास्तव उघडलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भारत निर्माण योजनेंतर्गत मागील दहा वर्षापूर्वी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील १२ गावांमध्ये केलेली कामे अपूर्ण असून पाणीपुरवठा मात्र सुरळीत असल्याची बाब शुक्रवारी झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीत उघडकीस आली. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पाणीपुरवठा योजनेच्या कामांची चौकशी करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीची सभा २६ मे रोजी डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात अध्यक्ष तथा सभापती नितीन गोंडाणे यांच्या अध्यक्षतेखाली बोलविण्यात आली होती. सभेत सदस्या अनिता मेश्राम यांनी नांदगाव तालुक्यातील पाणीटंचाईचा प्रश्न उपस्थित केला. भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत काजना, निमसवाडा, टाकळी गिलबा, सिध्दनाथपूर, चाकोरा, अडगांव खुर्द, जळू,नांदुरा खुर्द, हिंगलापूर, टाकळी कानडा, शिकरापूर आणि वाढोणा रामनाथ आदी गावांमध्ये साधारणपणे सन २००८ मध्ये पाणी पुरवठा व स्वच्छता समितीच्या माध्यमातून पाणी पुरवठ्याची कामे करण्यात आली. ही कामे पूर्णत्वास गेली नसली तरी येथे पाणी पुरवठा मात्र सुरळीत आहे, अशी माहिती विभागाचे उपअभियंता साखरकर यांनी दिली. यासर्व अपूर्ण कामांची चौकशी करण्याचे आदेश सीईओंनी दिले आहेत. नांदगाव तालुक्यातच हा प्रकार नसून संपूर्ण जिल्ह्यातच ही स्थिती आहे. सभेला अध्यक्ष नितीन गोंडाणे, उपाध्यक्ष दत्ता ढोमणे,सभापती जयंत देशमुख,बळवंत वानखडे,सुशिला कुकडे, समिती सदस्या पुजा हाडोळे, वासंती मंगरोळे,अनिता मेश्राम, पार्वती काठोळे, गौरी देशमुख, डेप्युटी सीईओ प्रकाश तट्टे, कार्यकारी अभियंता प्रमोद तलावारे, के.टी. उमाळकर, डेप्युटीसीईओ संजय इंगळे व सिंचन तसेच पाणी पुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता उपस्थित होते.मेळघाटातील पाणीटंचाईवर खलमेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील काही गावांत पाणीटंचाई आहे. मात्र याकडे प्रशानाचे दुर्लक्ष असल्याचा मुद्दा सदस्या वासंती मंगरोळे यांनी मांडला. यावेळी त्यांनी मडकी, खोगडा, खटकाली, झिंगापूर, मेनघाट, कुलंगणा, अंबापाटी, तारूबांधा, मोथाखेडा किनबंद आदी दहा गावांत भीषण पाणीटंचाई असताना उपाययोजना मात्र शून्य असल्याचे सांगितले. केवळ पस्ततलाई, मोथाखेडा , तारूबांदा याच ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. अंजनगांव तालुक्यात जलस्तर खालावला अंजनगांव सुर्जी तालुक्यात बागायती क्षेत्र आहे. मात्र, या भागातील पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे टाकरखेडा, धनेगांव, बोराळा येथे पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. यावर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सदस्या पूजा हाडोळे यांनी सभेत केली आहे. या परिसरात जलयुक्त शिवार योजनेतून कोल्हापूरी बंधारे, नाला खोलीकरण,गॅबीवन बंधारे होणे गरजेचे आहे. मात्र, यावर प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप पूजा हाडोळे यांनी केला.
जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना अपूर्णच
By admin | Published: May 29, 2017 12:09 AM