लोकमत इम्पॅक्ट
चिखलदरा : मागील चार दिवसांपासून पैसेच नसल्याने डिझेलअभावी उभे असलेले तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचे टँकर शुक्रवारी पहाटेपासूनच धावू लागले आहेत. स्थानिक प्रशासनाने कंत्राटदाराला उधारी चुकविण्याचे आश्वासन देत ही व्यवस्था केली. ‘लोकमत’ने यासंदर्भात वृत्त प्रकाशित करताच प्रशासनात खळबळ उडाली होती.
चिखलदरा तालुक्यात दरवर्षी किमान २५ आदिवासी पाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची गंभीर टंचाई निर्माण होते. तेथे कंत्राटदाराकडून टँकरने पाणीपुरवठा केला जातो. परंतु, संबंधित कंत्राटदाराला गतवर्षीची रक्कम देण्यात आली नाही. यंदाचा निधीसुद्धा अग्रिम देण्यात आला नाही. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या कंत्राटदाराने चार दिवसांपासून भाडेतत्त्वावर घेतलेले बाराही टँकर उभे केले होते. टँकरची चाके थांबल्याने आदिवासी पाड्यांमध्ये पाण्यासाठी हाहाकार माजला होता. शासनाचा निधी उपलब्ध नसल्याने स्थानिक प्रशासनही वारंवार पत्र पाठवून हतबल झाले होते.
बॉक्स
उधारीत धावू लागले टँकर
पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या टँकरचे चाके थांबल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी पाणीपुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराला लेखी पत्र देण्यासह गतवर्षीची रक्कम अदा करण्याचे आश्वासन दिले आणि त्यानंतर टँकर धावू लागले आहे.
बॉक्स
हा आहे खरा प्रकार
सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात टँकर चालू आहेत. कंत्राटदाराला प्राप्त होणाऱ्या वर्क ऑर्डरमध्ये गटविकास अधिकाऱ्यांनी डिझेलसाठी अग्रीम द्यावा, असे नमूद आहे. मात्र, कंत्राटदाराला डिझेलसाठी अग्रीम रक्कम देण्यात आली नाही. दुसरीकडे गतवर्षीची रक्कमसुद्धा न दिल्याने टँकरची चाके थांबली होती. आता दोन टप्प्यात जवळपास ६० लक्ष रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, सोमवारपर्यंत कंत्राटदाराला दिला जाणार आहे. याच लेखी आश्वासनावर टँकर धावू लागले.
कोट
निधी उपलब्ध नसल्यामुळे कंत्राटदाराचे देयके देता आली नाही. गतवर्षीची रक्कम सोमवारी देण्यासह यंदाचे देयक लवकर काढून देण्याचे आश्वासन दिले आहे. टँकर सुरू करण्यात आले.
- प्रकाश पोळ, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, चिखलदरा