पालकमंत्री : वरूड तालुक्यात विविध कामांचा शुभारंभ लोकमत न्यूज नेटवर्क वरूड : गाळयुक्त शिवार योजनेमुळे तलावाची साठवणक्षमता वाढून जमिनीची सुपीकता वाढेल. त्यामुळे याकामांना गती द्यावी, वेळ पडल्यास जलयुक्त शिवार योजनेचे उद्दिष्ट्य पूर्ण करण्यासाठी २४ तास काम करावे, असे निर्देश पालकमंत्री पोटे यांनी दिलेत. तालुक्यातील सावंगी येथे गाळयुक्त शिवार योजनेच्या कामाचा शुभारंभ व भारतीय जैन संघाच्या सहकार्याने श्रमदानातून तयार केलेल्या तलावाचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला आ. अनिल बोंडे यांच्यासह अनेक अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. पालकमंत्र्यांकडून एक लाखाची मदत वरूड : गाळयुक्त शिवार मोहिमेची कामे गतीने पूर्ण करावीत, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. दिवसा ऊन तापत असल्याने रात्री ही कामे पूर्ण करावीत. मात्र, काम थांबता कामा नये, असे यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले. यावेळी पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांनी गाळयुक्त शिवारात सहभागी क्षेत्रातील सुपीकतेच्या बदलांची नोंद ठेवावी, जेणेकरून याकामाचे महत्त्व इतरांपर्यंत पोहोचविता येईल. तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत विविध ठिकाणी गावतलाव, साठवण तलाव, लघुपाटबंधारे तलाव, माती नाला बांध, सिमेंट नाला बंधाऱ्यांतील गाळ काढून जलस्त्रोत मुक्त केले जात आहेत. काढलेला गाळ लोकसहभागाच्या माध्यमातून शेतांमध्ये टाकला जात आहे. यावेळी अमडापूर येथील जलयुक्त शिवार योजनेच्या कामांसाठी पालकमंत्री पोटे यांनी एक लाख रुपयांची मदत जाहीर केली. याकामांत यापुढे कुठलीही अडचण आल्यास शासनाकडून पूर्ण सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी सांगितले. येथील स्थिती सुधारण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तालुक्याची या योजनेसाठी निवड केली.
‘जलयुक्त शिवार’साठी रात्रंदिवस झटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2017 12:34 AM