पान २ चे सेकंड लिड
शेतजमीनही चोरीला, लाखो रुपयांचे गौण खनिज लंपास, महसूल विभाग संशयाच्या भोवऱ्यात
अनिल कडू
परतवाडा : मध्य प्रदेशाला जोडणाऱ्या परतवाडा-धारणी आंतरराज्य महामार्गावरील घाटवळणात राजस्व विभागाच्या डोळ्यांदेखत टेकडी पोखरून लाखो रुपयांचे गौण खनिज खुलेआम लंपास केले गेले. यात ती टेकडी, त्यावरील सागाची झाडे आणि शेतजमीनच चोरीला गेली आहे.
आंतरराज्य महामार्गावरील बुरडघाट, निमकुंडच्या पुढे अगदी डांबरी रस्त्याला लागून पहिल्याच घाटवळणावर यंत्राच्या साहाय्याने हे उत्खनन केले गेले. यादरम्यान सागवान वृक्षांनाही इजा पोहचविली गेली. वनक्षेत्राला लागून, किंबहुना वनक्षेत्रातच हे उत्खनन झाले आहे. त्यापूर्वी अचलपूर तालुक्यातील निमकुंड येथील मोतीराम बेठे व पाच लोकांनी मौजे निमकुंड, गट नंबर १३/४ क्षेत्र १.६२ हे.आर (भो.वर्ग-१) या शेत जमिनीच्या सपाटीकरणाची परवानगी अचलपूर उपविभागीय अधिकारी यांच्याकडून 15 जुलै २०२० ला घेतली होती. परवानगी मिळण्यापूर्वीच अर्जदारांनी कैलास कलाने यांना ११ महिन्याकरिता ही शेतजमीन शंभर रुपयाच्या दोन स्वतंत्र मुद्रांकावर संमतिपत्र व करारनामा करून सुपूर्द केली. पण, निमकुंड ग्रामपंचायतचा ठराव आणि स्थळनिरीक्षण निर्देशित करणारा दस्तावेज त्यात नाही. प्रकरणात तलाठी अहवाल, तहसीलदारांकडून गौण खनिज वाहतुकीस परवानगी, स्थळनिरीक्षण आणि सार्वजनिक बांधकाम विभाग व वनविभागाची भूमिका संशयास्पद ठरली आहे. सपाटीकरणाच्या नावावर तेथील शेतच चोरीला गेले आहे.
कोट:- शेत लागवडीस योग्य करण्याकरिता सपाटीकरणास परवानगी दिल्या गेली. या उत्खननाची चौकशी करण्यात येईल. गौण खनिज पळविणाऱ्यांवर दंड ठोठावण्यात येईल.
- संदीपकुमार अपार, उपविभागीय अधिकारी , अचलपूर
कोट:--
शेतजमिनीवर सागवान वृक्ष आहेत. सदर जमिनीस परतवाडा वर्तुळाचे वनक्षेत्र लागून नाही.
- प्रदीप भड, वनपरिक्षेत्र अधिकारी, परतवाडा
कोट:
धारणी मार्गावर बुरडघाटच्या पुढे रोडच्या साईडपट्ट्या भरायलाही वन विभागाची अनुमती नाही. उत्खनन आमच्या मार्गालगत घाटवळणावर असले तरी आम्हाला त्यावर बोलण्याचा अधिकार नाही.
- चंद्रकांत मेहत्रे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अचलपूर