केवळ व्यवसाय : ग्राहक हक्क का विसरलो?अमरावती : मनभरी उत्पादनाच्या चिवड्यात निघालेली पाल, त्यानंतर एफडीएने निर्मिती कारखान्याची केलेली तपासणी यातून मनभरी कारखान्यात पालींचा सतत वावर असल्याचे उघड झाले आहे. पालींच्या सहवासात तयार होणाऱ्या या उत्पादनातून मनभरीने ग्राहकांना आतापर्यंत किती पाली खाऊ घातल्यात, असा गंभीर सवाल निर्माण होतो. सिलबंद खाद्यपदार्थांचे उत्पादन होत असणाऱ्या कारखान्यात अन्न व औषधी प्रशासनाचे काटेकोर नियम पाळले जाणे आवश्यक आहे. एक माशीदेखील अन्न निर्माण होणाऱ्या कक्षात पोहोचू नये, असा नियम आहे. तथापि मनभरी उत्पादने तयार होतात तेथे विषबाधा होऊ शकणाऱ्या पालींचा सातत्याने वावर होता. पालींंना ये-जा करण्यासाठी तेथे मार्ग उपलब्ध होता. पालींच्या सानिध्यात अन्ननिर्मितीचे कार्य सुरू ठेवताना मनभरीच्या मालकाला जराही दखल घ्यावीशी वाटली नाही. लोक जे अन्न विश्वासाने सेवन करतात, त्या अन्नात लोकांच्या विश्वासाचा घात करून पालीसारखे विषारी प्राणी तळून मिसळले जाईपर्यंतचे अक्षम्य दुर्लक्ष उत्पादकांकडून केले जाते, याचा अर्थ काय लावायचा? हे अन्न इतरांसांठी असल्याने, केवळ उत्पन्न म्हणूनच या उत्पादनाकडे बघितले गेले, हे तेथील गैरव्यवस्थेतून लक्षात येते. वाचविता येतील तितके पैसे वाचवायचे, हा तद्दन व्यापारी उद्देश यामागे दिसतो. मनभरीची उत्पादने लोक खातात. घरातील लहानग्यांना देतात. ही उत्पादने जे तयार करतात, ती मंडळी त्यांच्या मुलाबाळांना हे अन्न खाऊ घालतात काय? ती पाल कुण्या लहान मुलाच्या चिवड्याच्या आली असती तर त्याने ती चिवड्यातील आगळा प्रकार समजून खाल्लीही असती. हा चिवडा निर्माण करणाऱ्या मंडळींच्या कुटुंबातील महिलांच्या, लहान मुलांच्या वाट्याला ही पाल येण्याची शक्यताच नसावी, म्हणूनच तर ती चिवड्यात पॅक केली गेली! आम्ही काय तयार करतो, याची जाण या मंडळींना असल्याशिवाय का इतके भयंकर गुन्हेगारी कृत्य घडते. 'अन्न परब्रह्म' असे आमच्या संस्कृतित सांगितले आहे. अत्यंत पे्रमाने आणि तितक्याच काळजीने बनविलेल्या आईच्या हातचा चिवडा खाणारे वऱ्हाड-विदर्भातील आणि महाराष्ट्रातील लोक आता सिलबंद चिवडा खाऊ लागले आहेत. उपवासालाही सिलबंद चिवडा बोलविला जातो. मनभरीचे उत्पादन अमरावतीचे असल्यामुळे येथील लोकांनी त्यावर माया दाखविली होती; परंतु या उत्पादनाला ती माया जपता आली नाही. 'धंदा' करू लागलेले हे उत्पादन चक्क पाली खाऊ घालू लागले. एक पाल दिसली. प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला; परंतु दाबता आले नाही म्हणून ते उघड झाले. उघड न होऊ शकलेली अनेक प्रकरणे रफादफा झाली नसतील हे कशावरून? पालीची तळलेली लहानगी पिले अनेकांच्या पोटात गेली नसतील, तळून चुरा झालेल्या पाली आणि किटकही अनेकांनी पचविले नसतील याचा काय भरवसा? हे घडू शकते कारण एकच- आम्ही ग्राहक हक्क गुंडाळून ठेवला म्हणून! जे विकले जाते, ते मुकाट्याने खातो म्हणून!
आम्ही किती खाल्ल्या पाली ?
By admin | Published: September 29, 2016 12:07 AM