अमरावती : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्या ठिकाणी सभा घेतील अथवा भाषण करतील, त्या जागेचं शुद्धीकरण करू, असा संकल्प खासदार नवनीत राणा यांनी गुरूवारी येथे केला. बडनेरा मार्गालगतच्या एका लॉनमध्ये आयोजित सामूहिक हनुमान चालिसा पठण कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
अमरावतीत गुरूवारी खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्यावतीने सामूहिक हनुमान चालिसाचे २१ वेळा पठण करण्यात आले. यावेळी बोलताना खासदार नवनीत राणा म्हणाल्या, मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी गेलो असता उद्धव ठाकरे यांच्या इशाऱ्यावर पोलिस प्रशासनाने देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला. एवढेच नव्हे १४ दिवस मुंबई येथील कारागृहात राहावे लागले. मी खासदार महिला असताना महाविकास आघाडी सरकारने कशाप्रकारे अन्याय केला, याचा पाढा नवनीत राणा यांनी वाचला.
मातोश्री बाहेर हनुमान चालीसाचा हट्ट धरणाऱ्या राणा दाम्पत्याला १४ दिवस तुरुंगात जावं लागले. त्यामुळे जो हनुमंताला अन् रामाला मानत नाही ते ठिकाण अपवित्र होते. त्यामुळे जिथे जिथे उद्धव ठाकरेंची सभा होईल त्या ठिकाणी उद्धव ठाकरे भाषण करेल ती जागा पवित्र करू त्या जागेच शुद्धीकरण करू, अशी प्रतिक्रिया खासदार नवनीत राणा यांनी दिली. दरम्यान आमदार रवी राणा यांनीदेखील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली.