चिखलदरा (अमरावती) : मला जंगल आवडतं. निसर्ग आवडतो. झाड, उंचावरून कोसळणारे धबधबेही. त्यामुळे २० वर्षांनंतर चिखलदरा पर्यटनस्थळावर परिवारासह भेट दिली. विदर्भाचे एकमेव पर्यटन स्थळ असताना विधानसभेत शासनाला विनंती करून चिखलदरा विकासावर चर्चा करणार, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
शनिवार व रविवार असे दोन दिवस आ. खडसे यांनी चिखलदरा, सेमाडोह, कोलकास या व्याघ्र प्रकल्पातील भागाला भेटी दिल्या. जंगल सफारीसुद्धा केली. सोबत पत्नी आणि सून खासदार रक्षा खडसे, नातू यांच्यासह जवळपास २० जण दोन दिवस मेळघाटात मुक्कामाला होते. पर्यटनस्थळावर जायला रस्ते, थांबायला हॉटेल, अर्धवट पडलेली विकासात्मक कामे, थांबलेला स्कायवॉक अशा अनेक समस्या विधानसभेत मांडणार असल्याचे आ. खडसे म्हणाले.
वाघाला मुकले, निलगाय दिसली
दोन दिवस मुक्कामादरम्यान आ. एकनाथ खडसे यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला भेटी दिल्या. जंगल सफारी केली. रानगवा, नीलगाईने यादरम्यान दर्शन दिले. मात्र, वाघोबाचे दर्शन नाथाभाऊंना झाले नाही.
रस्ता, वीज नाही, सिडको नावालाच
चिखलदऱ्यात रस्त्याची गंभीर समस्या आहे. विकासासाठी सरकारची दुर्लक्ष आहे. सिडको नावालाच घोषित केले आहे. त्यामार्फत होणारा विकास पूर्णतः खुंटला आहे. अनेक प्रकल्प पर्यटकांना आकर्षित करणारे होऊ शकतात. स्कायवॉकचे दोन पिल्लर उभे करून प्रकल्प अर्धवट ठेवण्यात आला आहे. अनेक आदिवासी पाड्यांमध्ये वीजसुद्धा नाही. सर्वच प्रश्न आपण एक-एक करून शासनदरबारी मांडणार असल्याचे आ. खडसे ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले.
वनमंत्र्यांशी चर्चा, विधानसभेत प्रश्न
डिसेंबरच्या अधिवेशनात विधानसभेमध्ये सरकारला चिखलदरा विकासासाठी चर्चा आयोजित करावी, अशी आपण विनंती करणार आहोत. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा करून वनपर्यटनाआधी विकासात्मक कामासाठी स्वतः पुढाकार घेऊन लक्षवेधी आणू, असे एका प्रश्नावर आ. खडसे म्हणाले.