मोर्शीतून शिकलेल्या विद्यार्थ्याचे संशोधन : शेतकऱ्यांना होणार मदत लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणवाडा थडी : मनात जिद्द असली की कोणतेही काम साध्य करता येते. असेच काही विवेक कुरवाडेबद्दल म्हणता येईल. विवेकने ब्राह्मणवाडा थडीसारख्या छोट्या गावात राहून मोर्शी शहरात शिक्षण घेतले आहे. अन् आता कोल्हापूरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असताना शेतकऱ्यांना मदत व्हावी, यासाठी हवामानाचा अंदाज सांगणारे अॅप तयार केले आहे. यामुळे त्याचे परिसरात कौतुक केले जात आहे. शेतकऱ्यंना पिकाबाबत योग्य मार्गदर्शन, बाजारपेठेतील शेतमालाचा भाव व हवामानाचा अंदाज मिळावा, जेणेकरून शेतकरी शेतीचे नुकसान टाळून शेतीचे उत्पन्न वाढवू शकेल, असा अॅप्स विवेक हनुमंतराव कुरवाडे या बी.टेक़च्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्याने सहकारी वर्गमित्राच्या मदतीने विकसित केला. याचे नाव ‘अग्रॅडाईड अॅप्स’ असे ठेवले आहे. या अॅप्सचे वैशिष्ट्य असे आहे की, हे अॅप्स दर तीन तासाचे हवामानाची योग्य माहिती पुरविते. वातावरणात अचानक होणाऱ्या बदलाची माहिती पुरविते. त्यामुळे शेतकरी आपल्या पिकाची सुरक्षा करू शकतो. या अॅप्सच्या सहाय्याने शेतकरी पीक पेरणीची योग्य वेळ ठरवू शकतो. तसेच पिकाचे नियोजन करू शकतो. पिकावर येणाऱ्या विविध रोग व किडीबाबत मार्गदर्शन मिळवू शकतो. त्याचप्रमाणे शासनाच्या कृषी विभागाबाबत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती मिळवू शकतो. या अॅप्सवर शेतकरी आपल्या विविध शंका व समस्या विचारून त्यावर कृषी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळवू शकतो. तसेच विविध बाजारपेठा व बाजार समितीमध्ये पिकांचे अद्ययावत बाजारभावाची माहिती या अॅप्सद्वारे मिळते.
मोबाईलवर मिळणार हवामानाचा अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2017 12:20 AM