अमरावती : मित्र नसल्यामुळे आलेला एकलकोंडेपणा व त्यातून सतत वेबसिरीज पाहण्याच्या आहारी गेलेल्या अल्पवयीन मुलाने पित्याला संपविल्याची खळबळजनक घटना औरंगाबादेत उघड झाली. त्याने मर्डर मिस्ट्री असलेल्या वेबसिरीज पाहूनच कोल्ड ब्लडेड मर्डर केल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले. तसा दावाच पोलिसांनी केला. त्यामुळे वेबसिरीजचे व्यसन, त्यातून वाढणारी हिंसकता, त्यातून घडणाऱ्या गुन्ह्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
अमरावतीमध्ये अनेक खुनाच्या घटनांमध्ये अल्पवयीनांचा समावेश आढळून आला आहे. तर, गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील एक अल्पवयीन मुलगा मोबाईलवेडामुळे पळून गेल्याची घटना देखील ताजी आहे.
वेबसिरीज ही एक मनोरंजनाच्या दुनियेतील नव्याने अस्तित्वात येणारी संकल्पना होय. तसं पहायला गेले तर टीव्ही वरच्या पारंपरिक डेलीसोप सारखीच ही एक डेली सोप, यू-ट्यूबवर जन्माला येणारी सिरियल म्हणजेच वेबसिरीज. चित्रपट प्रदर्शित न होण्याच्या कोरोना काळात या वेबसिरीजला चांगलेच भरते आले. अनेकजण अक्षरश: या वेबसिरीजच्या आहारी गेले. यात १० ते १७ वर्षे वयोगटातील मुलांचा अधिक समावेश आहे. वेबसिरीज पाहून कौटुंबिक वाद वाढणे, घरातून पळून जाणे, प्रसंगी टोकाचे पाऊल उचलणे, अशा घटना वाढल्या आहेत.
अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीत सहभाग?
देशातील अशा शेकडो गंभीर गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन बालकांचा सहभाग असल्याचे आढळून आले आहे, प्रत्येक शहरात आणि मोठ्या महानगरांमध्ये, बाल अपराधी हे गुन्हेगारी टोळ्यांमध्ये दिसतात. बाल अपराधी, गर्लफ्रेंडला महागड्या भेटवस्तू देणे आणि मजा-मस्तीचे आयुष्य जगण्यासाठी, नशा केल्यानंतर ते चुकीच्या मार्गावर जातात. अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीत सहभाग घेणे ही अत्यंत गंभीर बाब आहे.
बाल गुन्हेगारी प्रवृत्ती वाढविण्यात चित्रपट, टीव्ही, विशेषतः मोबाइलच्या भूमिकेकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. असंख्य लोक, लहान ते मोठे, सोशल मीडियाचे व्यसनी झाले आहेत, त्यामुळे रोज त्यांचा घरी तणावाचे वातावरण देखील असते, नुकत्याच झालेल्या गंभीर गुन्ह्यांतील दोषींनी कबूल केले आहे की सोशल मीडिया, इंटरनेट आणि वेबसिरीज पाहून त्यांना गुन्हा करण्याचे मार्ग कळले आहेत.
मुले मोबाईलवर काय पाहत आहेत?
आज घराघरामध्ये लहान मुले पाहत असलेला मोबाईल आणि त्यांचा एकूण ‘स्क्रीन टाइम’ हा पालकांसाठी डोकेदुखीचा विषय ठरला आहे. त्यामुळे मुलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. हा ‘स्क्रीन टाइम’ कमी होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे. मुले मोबाईल पाहताना इतकी तल्लीन होतात, की त्यांना काय आणि किती खावे याचे भान राहत नाही. पालकांनी मोबाईलची सवय मुलांना कुठून लागली, याचाही गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. ते मोबाईलवर काय पाहत आहेत, ते पालकांनी प्राधान्याने पाहणे गरजेचे आहे.
मानसोपचार तज्ज्ञ काय म्हणतात
दहा ते वीस वर्षांच्या मुलांना रात्रभर मोबाईल पाहायची सवय लागली आहे. मुलांचा कुटुंबीयांशीही संवाद कमी झाला आहे. मोबाईल दिला नाही तर मुले आक्रमक होतात, अशा तक्रारी आता कॉमन झाल्या आहेत. त्यातून त्यांना बाहेर काढायचे असेल, तर पालकांनी अधिक सजगपणे, डोळसपणे वावरले पाहिजे.
डॉ. श्रीकांत देशमुख, मानसोपचार तज्ज्ञ