अंजनगाव सुर्जी : येथील एका लग्नाच्या रिप्सेशनला गर्दी आढळून आल्याने तहसीलदारांनी आयोजकांना २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. लॉकडाऊनमध्ये लग्न समारंभासाठी वधू-वरासह केवळ २५ उपस्थितांची परवानगी आहे.
अंजनगाव सुर्जी येथील गोविंदनगरातील दिवाणी न्यायालयामागच्या परिसरात राहणारे अयूब खान युसूफ खान यांच्या घरात लग्नाचे रिसेप्शन सुरू होते. तिथे २५ हून अधिक व्यक्ती आढळल्याने खान यांना २५ हजार दंड ठोठावून तो तात्काळ वसूलही करण्यात आला. या कारवाईत जाहीद खान युनूस खान यांच्यावरही कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तहसीलदार वैशाख वाहूरवाघ, मुख्याधिकारी सुमेध अलोणे व ठाणेदार राजेश राठोड यांनी संयुक्तपणे मोहीम राबवून ही कारवाई केली. अंजनगावातील मुख्य चौकातही मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई केली जात असल्याचे वाहुरवाघ यांनी सांगितले.
अचलपूर एसडीओंकडून भाजी मंडईत जनजागृती
अचलपूर : कंटेनमेंट झोन घोषित केलेल्या अचलपूर शहरात उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी मंगळवारी सकाळी पथकासोबत जाऊन परतवाड्यातील भाजी मंडईला भेट दिली. भाजी मंडईत घाऊक व किरकोळ विक्रेत्यांची सकाळी मोठी गर्दी होण्याची शक्यता असते. त्यामुळे एसडीओंचे पथक सकाळीच तिथे जाऊन पोहोचले. त्यावेळी वाहनाला लावलेल्या पब्लिक ॲड्रेस सिस्टमच्या माध्यमातून अपार यांनी विक्रेते व ग्राहकांना नियम पालनाबाबत आवाहन केले. त्याचा अनुकूल परिणाम परतवाड्यातील भाजी मंडईत पाहायला मिळाला.
अमरावती तहसीलदारांकडून सिटीलँड, बिझीलँड परिसराची पाहणी
अमरावती : कंटेनमेंट झोनमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या शहरालगतच्या परिसराची पाहणी तहसीलदार संतोष काकडे यांच्या नेतृत्वातील पथकाने केली. त्याचप्रमाणे, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाची परीक्षा २३ ते २७ फेब्रुवारी दरम्यान चार केंद्रांवर होत आहे. त्यानुषंगाने सिपना अभियांत्रिकी महाविद्यालय, नानीबाई बी.एड. महाविद्यालय, विद्यापीठ कॅम्प परिसरातील पीसी पॉईंट तसेच सिटीलँड हब परिसरातील विन्सार इन्फोटेक या केंद्रांची पाहणी तहसीलदारांनी केली. परीक्षा केंद्रांवर अनावश्यक गर्दी होऊ नये, यासाठी वेळोवेळी भेटी दिल्या जात आहेत.