अमरावती : दोन आठवड्यांपासून पावसाची उघडीप असल्याने कोवळ्या पिकांचा खुरपडी (मिलीपेड) फडशा पाडत आहे. संरक्षित सिंचनाची सुविधा असणाऱ्या क्षेत्रात तुषार सिंचन संच बाहेर निघाले असले तरी जिरायती क्षेत्रात मात्र, शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.
जिल्ह्यात १० जूनला मान्सूनचे आगमन झाले असलेतरी मान्सून सक्रिय झालाच नाही. महिनाभरात केवळ दोनच दिवस सार्वत्रिक पावसाची नोंद झाली. त्यामुळे पहिल्या टप्प्यात पेरण्या झालेल्या भागातील कोवळी पिके दिवसाच्या उन्हात माना टाकत आहे. याशिवाय सोयाबीन पिकांवर वाणी, पैसा, नागवानी अळी आदी खुरपडींनी हल्ला चढविला. पिकांचे नुकसान होत असल्याने वेळीच व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे.
जिल्ह्यात यंदाच्या खरिपासाठी ६,९८,७९६ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. त्यातुलनेत सद्यस्थितीत ४,१४,९९२ हेक्टरमध्ये पेरणी झाली, ही ५९.३९ टक्केवारी आहे. पावसाची उघडीप असल्याने सोयाबीनच्या पेरण्या माघारल्या होत्या. मात्र, विखुरत्या स्वरुपात मृगसरी कोसळल्याने शेतकऱ्यांनी उत्साहाने पेरणी सुरू केली असता, पावसाचा खोळंबा झाल्याने पिकांवर किडींचे नवे संकट उभे ठाकले आहे.
कृषी विभागाच्या सद्यस्थितीत अहवालानुसार, धारणी तालुक्यात २३,९४७ हेक्टर, चिखलदरा १०,८२६, अमरावती ४२,२९१, भातकुली १५,३६०, नांदगाव खंडेश्वर ५३,६६१, चांदूर रेल्वे २८,७९६, तिवसा ३५,८९३, मोर्शी ४३,०७३, वरूड २६,६१४, दर्यापूर १२,२३३ अंजनगाव सुर्जी २३,७३५, अचलपूर २१,५५६, चांदूर बाजार २६,२४० व धामणगाव रेल्वे तालुक्यात ५०,७६३ हेक्टरवर पेरणी आटोपली आहे.
पाईंटर
पेरणीची जिल्हा स्थिती
खरिपाचे सरासरी क्षेत्र : ६,९८,७९६ हेक्टर
पेरणी झालेले क्षेत्र : ४,१४,९९२ हेक्टर
पेरणीची टक्केवारी : ५९.३९
कपाशीचे क्षेत्र : १,४९,५८२ हेक्टर
सोयाबीनचे क्षेत्र :१,६९,९४३ हेक्टर
तुरीचे क्षेत्र : ७५,११५ हेक्टर
बॉक्स
का उद्भवले संकट?
खुरपडी हा किडीचा प्रकार जमिनीतील सेंद्रिय पदार्थावर जगणारा आहे. हे सेंद्रिय पदार्थ पावसाअभावी कडक झाल्यामुळे खाण्यायोग्य स्थितीत नाहीत. त्यामुळे या किडींद्वारा कोवळी पिके, अंकूर, कोवळी पाने कुरतडून खात आहेत. ज्या ठिकाणी बीजप्रक्रिया करण्यात आलेली नाही तेथे किडींद्वारा नुकसान होत असल्याचे कृषी विभागाने सांगितले.
बॉक्स
ही करावी धुरळणी
ज्या ठिकाणी वाणीचा आकार मोठा व संख्या जास्त असेल तेथे हाताने गोळा करून रॉकेलमिश्रित पाण्यात टाकून नष्ट करावे. याशिवाय पिकांच्या ओळीत १.५ टक्के क्लोरोपारीफॉस भुकटी २० ते २५ किलो प्रति हेक्टर याप्रमाणे सकाळी किंवा संध्याकाळी वारा शांत असताना धुरळणी करावी. पंपाचे नोझल सैल करून क्लोरोपारीफॉस २० टक्के प्रवाही हे कीटकनाशक १० लीटर पाण्यात ३७.५ मिली मिसळून फवारणी करण्याचे आवाहन एसएओ विजय चवाळे, प्रादेशिक संशोधन केंद्राचे डाॅ अनिल ठाकरे यांनी केले आहे.