लोकमत न्यूज नेटवर्ककरजगाव : चांदूर बाजार तालुक्यातील कुऱ्हा देशमुख येथील एका शेतकऱ्याने आपल्या शेतात टू-फोर डी या तणनाशकाची फवारणी चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे आजूबाजूच्या शेतातील पिके करपली आहेत. त्यामुळे १६ जणांच्या ४० एकर क्षेत्रातील तूर व कपाशीच्या पिकांचे नुकसान झाले. तालुकास्तरीय समितीने नुकसानाचा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व तहसीलदारांकडे सोपविला आहे. चांदूरबाजार तालुक्यातील मौजा खेल खुशाल देशमुख येथील शेत सर्व्हे नंबर ५५ ते ते ५८ मधील शेतकरी तथा कुऱ्हा देशमुख येथील पोलीस पाटील पवन देशमुख यांनी आठ दिवसांपूर्वी त्यांच्या ज्वारीच्या शेतात टू-फोर डी हे अतिजहाल तणनाशक सदर कंपनीच्या निर्देशित सूचनांचे पालन न करता व कुठलीही सावधगिरी न बाळगता फवारणी केले. तणनाशक हवेच्या दिशेनुसार ४० एकर क्षेत्रावर पसरून डॉलात असलेली पिके बाधित झाल्याची तक्रार १६ शेतकऱ्यांनी शिरजगाव पोलीस ठाणे व तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे केली होती. त्यापूर्वी काही शेतकऱ्यांनी पवन देशमुख यांच्या कानावर ही बाब घातली असता, त्यांनीच दम दिल्याचे शेतकऱ्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. पंचायत समितीचे कृषी अधिकारी एन. के. अमझरे, मंडळ कृषी अधिकारी एस. पी. दांडेगावकर, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ के.पी. सिंग, कृषिसहायक, दिनेश वऱ्हाडे यांच्या तालुकास्तरीय समितीने तक्रारदार शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी केली. समितीला मौसराम दांडगे, राजेंद्र भेंडे, संजय अकोलकर, पंजाबराव अकोलकर, साहेबराव व्यवहारे, संजय ढाकूलकर, श्रीकृष्ण अकोलकर, प्रकाश अकोलकर, बाळुराम अकोलकर, जगन्नाथ अकोलकर, सुरेश अकोलकर, नितीन अकोलकर, गजानन भेंडे, विश्वास कथे, गजानन ढाकूलकर, सुनील ढाकूलकर, अनिता ढाकूलकर, गजानन ढाकूलकर, अशोक ढाकूलकर यांच्या शेतातील कपाशी व तुरीचे नुकसान निदर्शनास आले. त्यातील कपाशीची पाने निमुळती जाड व लांबट होऊन पात्या सुकून गेल्याचे दिसून येत असून, तुरीच्याही पानांचा आकार कमी होऊन शेंडे सुकले आहेत, असे निरीक्षण समितीने नोंदवले.
समितीने या सुचविल्या उपाययोजना नवीन फूट चांगली येण्यासाठी युरिया १ टक्का (१ किलो युरिया प्रति १०० लिटर पाणी) फवारणी करावी. कॅल्शियम कार्बोनेट १.५ किंवा जिब्रॅलिक ॲसिड ५० पीपीएची फवारणी करावी
खरीप हंगामात टू-फोर डीची फवारणी अयोग्य आहे. कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूरचे शास्त्रज्ञ व पंचायत समितीच्या चमूने पाहणी केली. अहवाल तयार करण्यात आलेला आहे.- अंकुश जोगदंड तालुका कृषी अधिकारी, चांदूर बाजार
फवारणीतून पिके करपल्याच्या प्रकरणाची तक्रार प्राप्त झाली आहे. प्रकरण चौकशीत आहे. कृषी अधिकाऱ्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल.- पंकज दाभाडे ठाणेदार, शिरजगाव कसबा