उलाढालीला खोडा, दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदीसाठी पैसा आणणार कुठून?
आसेगावपूर्णा : ग्रामीण भागातील लोकांना स्वत:कडील वस्तूंच्या खरेदी-विक्रीसाठी आधार ठरलेले आठवडी बाजार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद केल्याने ग्रामीण अर्थचक्रालाच टाळे लागले आहे. अनेकांच्या उपजीविकेसोबतच कितीतरी प्रश्न एकाच वेळी उभे ठाकले आहेत.
अचलपूर विधानसभा मतदारसंघातील परतवाडा तसेच चांदूर बाजार शहराला जनावरांच्या आठवडी बाजारांनी जिल्हाभर ओळख दिली. या ठिकाणी लहान वस्तूपासून ते मोठ्या कुठल्याही वस्तू मिळण्याची आठवडी बाजाराचे ठिकाण कधी बंद नसायचे. मात्र, कोरोना संसर्ग पसरण्याच्या भीतीने वर्षभरात दुसऱ्यांदा हे बाजार बंद झाले. परतवाडा व चांदूरबाजार येथील तालुकास्तरीय बाजारातील उलाढाल लाखोंच्या घरात होती, शिवाय यावर अनेकांची उपजीविका होती. शेतातील माल विकण्याचा हा सोपा पर्यायदेखील होता. भाजीपाला, अन्नधान्य विकायचे आणि याच पैशांतून दैनंदिन बाजारहाट करायची ही साखळी ग्रामीण भागासाठी पूरक होती. मात्र, आठवडी बाजार भरण्यास मनाई केल्यामुळे नेहमीच लोकांनी गजबजणारे व आपले अर्थचक्र चालवित असलेले आठवडी बाजार बंद झाल्याने या बाजार परिसरात सर्वत्र शुकशुकाट पसरला आहे.
गतवर्षीच्या लॉकडाऊननंतर आठवडी बाजार भरायला सुरुवात होत असतानाच ते पुन्हा बंद झाल्याने यावर अवलंबून असणारे अनेक जण हादरले. कारण वर्षभरापासून या संकटाने कोलमडलेले व्यवसाय आता कुठे स्थिरावत असताना, पुन्हा एकदा संकट उभे ठाकले. कठोर बंधने घातली जावी, पण आठवडी बाजाराला परवानगी द्यावी, अशी मागणी अनेकांकडून होत आहे.
---------------
आठवडी बाजारामध्ये शेतातील माल विकून दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदी करणे शक्य असायचे. मात्र, कोरोनामुळे बाजार बंद असल्याने विकायची कुठे , हा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे पैसे हाती येणार नाहीत. त्यामुळे खरेदी करताना हात आखडता घ्यावा लागत आहे.
- श्रीकृष्ण गव्हाळे, शेतकरी, खैरी दोेनोडा
---------------
कॅप्शन - आसेगाव पूर्ण येथील आठवडी बाजाराच्या दिवशी ओस पडलेला बाजार परिसर.