आॅनलाईन लोकमतअमरावती : शहरी भागात स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या क्षेत्रात जन्माला आलेल्या बाळाचे स्वागत संबंधित कुटुंबाला वृक्ष किंवा फळझाडांची रोपे देऊन करावे लागणार आहे. याकरिता नगरविकास विभागाने पुढाकार घेतला असून, ‘वृक्षांची जोपासना हीच निसर्गाची उपासना’ या अंतर्गत हा उपक्रम राबविला जाणार आहे.राष्ट्रीय वननीती, १९८८ मधील धोरणानुसार देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के क्षेत्रावर वृक्षाच्छादान, वनीकरण असणे आवश्यक आहे. परंतु, राज्यात हे प्रमाण एकूण भौगोलिक क्षेत्राच्या सर्वसाधारणपणे २० टक्के आहे. त्यामुळे तापमानात सातत्याने होणारी वाढ, हवामान आणि ऋतूमध्ये होणारे बदल, दुष्काळ किंवा अतिवृष्टी, पूर आदी नैसर्गिक आपत्तींवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी वृक्ष लागवडीचा भरीव कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. वृक्ष लागवड हा कार्यक्रम लोकचळवळीत रूपांतरित करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटक, व्यक्ती, कुटुंब, संस्था आदींचा सहभाग महत्त्वाचा गणला आहे. पुणे जिल्ह्यातील रानमळा ग्रामपंचायतीने जन्म, विवाह आणि मृत्यू आदी प्रसंगाच्या निमित्ताने लोकसहभागातून वृक्ष लागवडीचा पॅटर्न आता राज्यभरात राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. प्रामुख्याने महापालिका, नगर परिषद, नगरपंचायतींमध्ये ‘वृक्षांची जोपासना हीच निसर्गाची उपासना’ हा उपक्रम राबविण्याचे लक्ष आहे. यात जन्म वृक्ष, शुभमंगल वृक्ष, माहेरची साडी, आनंद वृक्ष, स्मृती वृक्ष अशा प्रकारात स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या क्षेत्रात वृक्ष लागवड करावे लागणार आहे. जन्माला बाळ आल्यास सदर कुटुंबाकडे जाऊन बाळाच्या जन्माचे स्वागत तसेच विवाहप्रसंगी वधू-वरांना शुभाशीर्वाद म्हणून रोपटे द्यावे लागणार आहे. विवाहित मुलगी सासरी गेल्यास तिच्या आई-वडिलांना आपल्या लेकीप्रमाणे माया देऊन झाडांचे संगोपन करण्यासाठीे विनंती प्रशासनाला करावे लागणार आहे. इयत्ता दहावी व बारावीत उत्तीर्ण, नोकरी, स्पर्धा परीक्षेत यशस्वी अथवा निवडणुकांमध्ये विजयी उमेदवारांचे रोपटे देऊन स्वागत करावे लागेल. स्मृती वृक्ष संबंधित दिवंगत व्यक्तीच्या कुटुंबीयांना वृक्ष, फळझाडांंची रोपे देऊन श्रद्धांजली अर्पण करावी लागेल तसेच सदर व्यक्तीच्या कुटुंबीयांना त्या रोपाचे रोपण करून झाडाच्या रूपाने आपल्या प्रिय व्यक्तीच्या स्मृती जतन करण्याबाबत विनंती करावी लागणार आहे.अशी आहेत वृक्षारोपणाची उद्दिष्टेमहापालिका प्रतिवॉर्ड ६०० वृक्ष लागवड. ‘अ’ वर्ग नगर परिषद प्रतिवॉर्ड ३००. ‘ब’ वर्ग नगर परिषद १५०. ‘क’ वर्ग नगर परिषद आणि नगरपंचायती प्रतिवॉर्ड १००.
बाळाच्या जन्माचे स्वागत आता रोपट्याने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2018 10:12 PM
शहरी भागात स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या क्षेत्रात जन्माला आलेल्या बाळाचे स्वागत संबंधित कुटुंबाला वृक्ष किंवा फळझाडांची रोपे देऊन करावे लागणार आहे.
ठळक मुद्देनगरविकास विभागाचा पुढाकार : ‘वृक्षांची जोपासना हीच निसर्गाची उपासना’