वेतन, थकीत रकमेची मागणी : महापालिका कर्मचारी संघटनेने दिले पत्र अमरावती : महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून चंद्रकांत गुडेवार यांची राज्य शासनाने नियुक्त केली असून ते सोमवारी १३ एप्रिल रोजी अमरावतीत येत आहेत. मात्र, तीन महिन्यांचे थकीत वेतन, सहाव्या वेतन अनुदानाच्या फरकाची रक्कम, अंशदान योजनेतील रक्कम मिळावी, यासाठी कर्मचारी संघटनेने १७ एप्रिल रोजी संप पुकारण्याबाबतचे पत्र दिले आहे. परिणामी नव्या आयुक्तांचे संपाने स्वागत होणार आहे.तत्कालीन आयुक्त अरुण डोंगरे यांच्या जागी सोलापूर महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची वर्णी लावली आहे. डोंगरे यांना बदलीच्या ठिकाणी आदेश न काढणे यामागे बरेच षडयंत्र वजा राजकारण असल्याची चर्चा जोर धरु लागली आहे. राज्यातून एलबीटी हटविल्याने महापालिकांची आर्थिक स्थिती नाजूक झाली होती. मात्र, अरुण डोंगरे यांनी उत्पन्न वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांमुळे अमरावती महापालिका राज्यात पाचव्यास्थानी राहिली. परंतु शासनाने अर्थसंकल्पात एलबीटी हद्दपार करण्याची घोषणा करताच एलबीटीचे उत्पन्न कमालीचे घसरले आहे. याचा फटका तिजोरीवर बसला असून वेतनाची बोंबाबोंब, कंत्राटदार व पुरवठादारांचे थकबाकी कायम आहे. दुसरीकडे कर्मचारी संघटनेने वेतन, थकबाकीची रक्कम मिळावी, यासाठी संपाचे हत्यार उपसल्याने नव्या आयुक्तांपुढे समस्यांचा डोंगर हे चित्र राहणार आहे. तीन महिन्यांचे वेतन थकीत असल्याची कर्मचाऱ्यांची ओरड आहे. अनेक प्रकल्प रखडले असून ते मार्गी लावण्यासाठी नवे आयुक्तांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. वसुली ठप्प पडल्याने ही बाब कारणीभूत ठरणारी आहे. (प्रतिनिधी)चर्चेअंती संपाचा निर्णयनियमित वेतन, सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम मिळावी, यासाठी कर्मचाऱ्यांचा काही वर्षांपासून लढा सुरु आहे. मागण्या पूर्ण व्हाव्यात, याकरिता संपाबाबतचे प्रशासनाला पत्र दिले आहे. नवे अयुक्त आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करु. सकारात्मक तोडगा निघाल्यास संपाबाबत निर्णय घेणार, अशी माहिती कर्मचारी संघटनेचे प्रल्हाद कोतवाल, मंगेश वाटाणे यांनी दिली.७० ते ७५ कोटींची देणी कायमकर्मचारी, शिक्षकांचे वेतन, थकबाकी तसेच अंशदान योजना, सेवानिवृत्त वेतन, सेवानिवृत्त वेतन विक्री, पुरवठादार, कंत्राटदारांची देणी, सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम आदी बाबींवर ७० ते ७५ कोटी रुपयांची देणी असल्याचे लेखापाल शैलेंद्र गोस्वावी यांनी दिली. कर्मचाऱ्यांना फेब्रुवारीचे वेतन सोमवारी देण्याची तयारी चालविली आहे.
नव्या आयुक्तांचे संपाने स्वागत!
By admin | Published: April 12, 2015 12:31 AM