गजानन मोहोड लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : सुरुवातीला पावसात खंड, नंतर सातत्याने पाऊस व अतिवृष्टीमुळे पश्चिम विदर्भातील ५.२० लाख हेक्टरमधील खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला. विभागीय आयुक्तांनी खरिपाची अंतिम पैसेवारी ४७ अशी जाहीर केली असल्याने विभागातील ५३ तालुक्यांमधील ७ हजार २०८ गावांच्या ओल्या दुष्काळस्थितीवर शिक्कामोर्तब झाले आहे. वाशिम जिल्ह्यात वाशिम व मंगरुळपीर तालुक्याची पैसेवारी मात्र ५० पैशांहून अधिक आहे.
यंदा खरिपात ३१ लाख ५० हजार ३०० हेक्टरमध्ये पेरणी झाली. कंपन्यांनी सोयाबीनचे वांझोटे बियाणे माथी मारल्याने अर्ध्याधिक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली. पावसाने दांडी मारल्याने मूग व उडीद पीक बाद झाले. सोयाबीन फुलोरावर व शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना पावसाची रिपरिप ऑक्टोबर अखेरपर्यंत सुरू होती. त्यामुळे शेतातील सोयाबीन जागीच सडले. सवंगणी करून लावलेली गंजी भिजून सोयाबीनची प्रतवारी खराब झाली. उत्पादनखर्चही निघाला नाही. आता दुष्काळावर शिक्कामोर्तब झाल्याने शेतकऱ्यांना आठ प्रकारच्या सवलती मिळू शकतात.
या सवलतींचा मिळू शकतो लाभ n ५० पैशाच्या आतील गावांना जमीन महसुलात सूट, पीक कर्ज व कृषिपंपाच्या वीज बिल वसुलीला स्थगिती, रोहयोची कामे, शाळा व महाविद्यालयीन शैक्षणिक शुल्क माफी, आदी सवलती मिळू शकतील. n याशिवाय दुष्काळस्थितीमुळे खरीप पीक विम्याचा फायदाही शेतकऱ्यांना मिळू शकतो.