अमरावती : समग्र शिक्षा अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात येतो. परंतु, नेहमीप्रमाणेच यंदाही शिक्षण विभागाच्या तिजोरीत गणवेशाच्या निधीसाठी ठणठणाट आहे. मुलांना वेळेवर गणवेश मिळत नाही, तोच आता ऑनलाइन शिक्षण सुरू होत आहे. त्यामुळे माझ्या शालेय गणवेशाचा रंग कोणता, असा प्रश्न विद्यार्थ्यांमधून उपस्थित होत आहे.
दरवर्षी विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सव हा जुन्याच गणवेशावर होतो. किमान अर्धे शैक्षणिक सत्र होईपर्यंत तरी विद्यार्थ्यांना नव्या गणवेशाची वाट बघावी लागते. यंदाही शिक्षण विभागाची काही परिस्थिती वेगळी नाही. कोरोना विषाणू संसर्गामुळे गतवर्षीप्रमाणेच यंदाही शाळा ऑनलाइन राहणार आहेत. जिल्ह्यात २८ जूनपासून नवीन शैक्षणिक सत्र शाळा सुरू होत आहे. परंतु, शाळेकडून विद्यार्थ्यांना मोफत दिल्या जाणाऱ्या गणवेशाची प्रतीक्षाच करावी लागणार आहे. समग्र शिक्षा अभियानाकडे गणवेशासाठी निधीच नाही.
--------------
कोणाला दिला जातो मोफत गणवेश?
जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व मुलींना समग्र शिक्षा अभियान अंतर्गत दोन मोफत गणवेश दिले जातात. त्यानंतर इयत्ता पहिली ते आठवीतील अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीतील मुलांसह ओबीसी, दारिद्ऱ्यरेषेखालील मुलांनाही मोफत गणवेश दिला जातो.
-----------------
पहिली, दुसरीतील विद्यार्थ्यांना गणवेशच माहीत नाही
कोरोना विषाणू संसर्गामुळे गतवर्षापासून शिक्षण ऑनलाइन झाले आहे. ऑनलाईन वर्गात कोणता गणवेश घातला, याला महत्त्वच राहिलेले नाही. त्यामुळे मागील वर्षी आणि यावर्षीच्या पहिली, दुसरीतील विद्यार्थ्यांना आपल्या शाळेचा गणवेश कोणता आहे, हेच माहीत नसल्याचे चित्र आहे.
---------------
समग्र शिक्षा अभियानाकडे सध्या गणवेशासाठी निधी उपलब्ध नाही. निधी प्राप्त होताच, शाळा स्तरावर थेट वितरण करण्यात येईल.
ई.झेड खान, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), अमरावती
---------------
स्थानिक स्वराज्य संस्थांतील सर्व मुलामुलींना मोफत दोन गणवेश देण्यात यावे. पाठ्यपुस्तक व लेखन साहित्य पुरविण्यात यावे.
- राजेश सावरकर, राज्य प्रसिद्धी प्रमुख, म.रा. प्राथमिक शिक्षक समिती