अमरावती: अंबानगरीचा ईतवारा बाजार हा भाजीपाला, अन्नधान्य, फळे यासह नागरिकांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू, साहित्य विक्रीसाठी प्रसिद्ध आहे. त्यातही प्रत्येक रविवारचा ईतवारा बाजार हा अनेक वर्षांपासून आपले वेगळेपण जपून आहे. घरगुती वापरासाठी कोणतेही जुनी वस्तू, साहित्य हवे असल्यास ते सहजतेने येथे उपलब्ध होते. म्हणूनच काय हवं? चला ईतवारा बाजारात... असे आपसूकच मुखातूृन बाहेर पडल्याशिवाय राहत नाही, हे विशेष.
अमरावती शहराची ऐतिहासिक ओळख, संस्कृती आहे. एकवीरा-अंबादेवीचे अधिष्ठान आहे. परकोटाने वेढलेले शहर असून पर्यटनाचे वेगवेगळे स्थळ आहे. अमरावतीचे नैसर्गिक सौदर्यं, हिरवळ आणि प्रदूषणमुक्त अशी ओळख आहे. बदलत्या काळानुसार नवीन बाबी आत्मसात करणे हे या शहराचे वैशिष्टे आहे. असे असले तरी जुने वैभव, संस्कृती, भाषा, ओळख टिकवून ठेवताना हिंदू -मुस्लिम ऐक्याची अंबानगरीला किनार लाभली आहे. अमरावतीचा ईतवारा बाजार हा सतत वर्दळ आणि वाहनांची गर्दी असलेला परिसर आहे. सायकल, दुचाकी, रिक्षा, हातगाड्या, कटले, ऑटोरिक्षांची ये-जा हा येथे नेहमीचा शिरस्ता आहे. ईतवारा बाजारात जायचे म्हटले की नको असे म्हणत अनेक जण जायचं टाळतात. मात्र, रविवारी परंपरागत भरणाऱ्या ईतवारा बाजारात जुने साहित्य, वस्तू विक्री खरेदीसाठी चिक्कार गर्दी होते. घरी काय हवं तर अनेक पिढ्यांपासून आजतागायत अमरावतीकरांची पावले ईतवारा बाजाराकडे आपसूकच वळतात, हे मात्र खरे आहे.ईलेक्ट्रॉनिक्स सुटे भाग, फर्निचर खरेदीला प्राधान्यरविवारी भरणाऱ्या ईतवारा बाजारात ईलेक्ट्रॉनिक्स वस्तू, फर्निचर खरेदीला अनेक जण प्राधान्य देतात. दरम्यान, विकास डोंगरे यांच्याशी विचारणा केली असता ईलेक्ट्रॉनिक्स स्पेअर पार्ट स्वस्त दरात मिळत असल्याने ते सहज परवडणारे आहे, असे ते म्हणाले. फर्निचर, दरवाजे सुद्धा येथे स्वस्त दरात मिळत असल्यामुळे गरीब, सामान्यांना ते खरेदी सुलभ होते, असे हाजी रहमत खान यांनी सांगितले.