संशय : १६ हजारांचा की अडीच लाखाचा ?टाकरखेडा संभू : अन्न व प्रशासन विभागाने मंगळवारी वलगाव येथील साई कीराणा स्टोअर्सवर धाड टाकून सोळा हजार रुपये किंमतीचा गुटखा व सुगंधी तंबाखू जप्त केला. परंतु ही कारवाई संशयास्पद असल्याची चर्चा असून हा गुुटखा सोळा हजार रुपयांचा की अडीचलाख रुपयांचा असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.अन्न व प्रशासन विभागाच्या दोन अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी धाड टाकली होती. परंतु येथे छावा संघटनेचे अंबादास काचोळे व त्यांच्या काही पदाधिकाऱ्यांसोबत घटनास्थळी धाव घेतली. त्यांनीच दुकान मालकाचे अन्य दोन गोडावूनमध्ये लाखो रुपयाचा माल असल्याची माहिती या अधिकाऱ्यांना दिली. साई किराण्यावर धाड पडल्याची माहिती अन्न व प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वलगाव पोलिसांना दिली नव्हती. त्यामुळे या कारवाईवर छावा संंघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये व अन्न प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये तू-तू मै-मै झाली होती. अशीच कारवाई दोन महिन्यांपूर्वी झाली होती. परंतु येथे जमाव जमल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने अधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला होता. घटनास्थळी उपस्थित अनिरुद्ध उगले, भारत उगले, पिंटु तिवारी, गोपाल कुऱ्हेकर, सुशील भवाने आदींसह नागरिकांचा जमाव निर्माण झाला. त्यांनी कडक कारवाई करण्याचे मागणी केल्यानंतर अन्न प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त मिलींद देशपांडे घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांच्या समवेत अन्न सुरक्षा अधिकारी विश्वजित शिंदे व फारीक सिद्यीकी यांनी सोळा हजाराचा गुटखा जप्त करुन गुन्हा नोंदविला आहे. तथापी या ठिकाणावरून सुमारे अडीच लाख रुपयांचा गुटका आढळल्याची जोरदार चर्चा परिसरात असून कारवाईवर प्रश्नचिन्ह लागले आहे.
वलगावात पकडलेला गुटखा कितीचा?
By admin | Published: January 17, 2016 12:10 AM