अमरावती/ संदीप मानकर
संचारबंदीत शिथिलता मिळताच शहरातील मोबाईल शॉपीमध्ये दुरुस्ती तथा खरेदीकरिता नागरिकांची गर्दी उसळली. काही विनामास्क, तर सेल्फ डिस्टंसिंगचा पूर्णत: फज्जा उडाला. यावरून मोबाईल बिघडला म्हणून काय झाले, आरोग्य बिघडायला नको, असे उद्गार सुजाण नागरिकांच्या तोंडून ऐकायला मिळाला.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये १ जूनपासून कोरोना संदर्भातील निर्बंध शिथिल करण्यात आले. बाहेर पडायची वेळ दुपारी २ वाजेपर्यंतच असल्याने सर्वसामान्य नागरिक छोट्या-छोट्या कामासाठी बाहेर पडून बाजारपेठेत गर्दी करीत आहेत. त्यात नवीन मोबाईल खरेदी करणे व जुना मोबाईल दुरुस्ती करण्यासाठी शुक्रवारी राजकमल चौकासह इतर महत्त्वाच्या चौकांतील मोबाईल दुकानांत गर्दी केली होती. असे असताना अनेकांनी मास्क घातले नव्हते. दुकानात फिजिकल डिस्टंसिगचा फज्जा उडाला. त्यामुळे कोरोनावर मात कशी करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अद्यापही कोरोना संपला नसून मोबाईल बिघडला म्हणून काय झाले, आरोग्य बिघडायला नको, अशी प्रतिक्रिया काही तज्ज्ञांची होती.
येथील महत्त्वाचा चौक मानल्या जाणारा राजकमल चौक, जयस्तंभ चौकात काही मोबाईल विक्री व दुरुस्तीच्या दुकानात जावून रियालिटी चेक केली असता, गत दिड महिन्यापासून मोबाईलचे दुकाने बंद होती. त्यामुळे नवीन मोबाईल खरेदीला अचानक ब्रेक लागला. तसेच ज्यांचे मोबाईल नादुरुस्त झाली. त्यांना मोबाईल दुरुस्तीकरिता कुठलाही पर्याय उपलब्ध नव्हता. त्यामुळे दुकाने उघडतास अनेकांनी मार्केटमध्ये धाव घेतली. काहींनी मोबाईल दुरुस्तीकरिता आल्याचे तर काहींनी नविन मोबाईल खरेदी करण्याकरिता आल्याचे सांगितले. कोरोनाची भीती जरी असली तरी मोबाईल हे जीवनातील महत्त्वाचे साधन झाल्याने त्याच्याशिवाय राहणे कठीण झाल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.
बॉक्स
स्क्रीन गार्ड, मोबाईल रिपेअरिंग
लॉकडाऊन दरम्यान अनेकांचा मोबाईल खाली पडल्याने स्क्रीन गार्ड फुटले तर अनेकांचे डिस्प्ले गेले. काहींचे चार्जर खराब झाले तर काहींची मोबाईल हँग झाले. त्यामुळे समस्या सोडविण्याकरिता अनेक नागरिकांनी मोबाईल दुरुस्ती करणाऱ्या मोबाईल शॉपीच्या संचालकांशी संपर्क साधून कुणी मोबाईची बॉडी बदलविली. तर कुणी रिंगर, स्क्रीन गार्ड व कोम्बो टाकून घेतला.
बॉक्स
दीड महिन्यापासून मोबाईल दुकाने बंद
सव्वा वर्षात टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन झाले त्यामुळे मोबाईल व्यावसायिकांचा वर्षभर व्यवसाय बुडाला. अमरावतीत फेब्रुवारी पासून तर ३१ मे पर्यंत अनेकदा कडक निर्बंध लावून लॉकडाऊन केल्या गेले. मात्र एप्रिल व मे महिन्यात दिड महिना सर्वाधिक लॉकडाऊन करण्यात आल्याने दीड महिन्यापासून शहरातील मोबाईल दुकानदारांनी शेटर उघडलेच नाही. १ जून पासून शेटर उघडण्यात आले.
कोट
नवीन मोबाईल खरेदीसाठी तसेच रिपेरींगकरीता ग्राहक येत आहेत. यात चार्जर स्क्रीनगार्डची मागणी जास्त आहे. दुकानात सॅनिटायझरचा वापर केला जात आहे. मास्कसाठी सक्ती केली जाते.
सागर तरडेजा, मोबाईल शाॅपी संचालक राजकमल
कोट
गत वर्षीच्या तुलनेत यंदा पाहिजे तसा व्यवसाय राहला नाही. गेल्या दोन दिवसापासून काही ग्राहक संपर्क करीत आहेत. प्रशासनाने दोन वाजता ऐवजी सायंकाळी ७ वाजेपर्यंत वेळ द्यावा म्हणजे नागरिकांची गर्दी सुद्धा होणार नाही.
शरद गासे, मोबाईल संचालक राजकमल चौक
कोट
मोबाईलमध्ये मेमरी स्टोरेज कमी असल्याने मोबाईल हँग झाला. त्याला दुरुस्तीकरण्याऐवजी नवीन मोबाईल घेण्याचा निर्णय घेतला. कोरोनाची भीती आहे. मात्र तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल जीवनावश्यक बाब झाली आहे.
आकाश वैद्य, ग्राहक अमरावती
कोट
मोबाईल खराब झाला आहे. त्याला दुरुस्तीपण करायची होती व एक नवीन मोबाईल खरेदी करायचा होता. दीड महिन्यापासून दुकान उघडण्याची प्रतीक्षा होती.
स्वप्निल अर्मळ ग्राहक पिंपळखुटा